पुणे : भारतात मोठया प्रमाणात झालेल्या डिजिटलायझेशनमुळे प्रत्येक सेवेची आर्थिक नोंद होत आहे. प्रत्यक्ष नोंद होत असल्याने देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मध्ये देखील याची गणना केली जाईल. आपण प्रत्येकाला रोख व्यवहारापासून दूर नेत डिजिटलाईज झालो, तर सन २०२७ किंवा २०२८ ला भारत तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर (मुंबई) यांनी केले.
स्वानंद प्रतिष्ठानच्यावतीने स्वानंद व्याख्यानमालेचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील संस्कार गुरुकुल येथे करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या सत्रात ते बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ सुनील सप्रे, सुनील भिडे, माजी नगरसेविका अश्विनी पोकळे, नीता दांगट पाटील, प्रतिष्ठानचे प्रकाश असलेकर आदी उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठविला.
दीपक करंजीकर म्हणाले, अर्थव्यवस्थेचे मापन हे सकल राष्ट्रीय उत्पन्नावर केले जाते. जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी असून अमेरिका, चीन, जपान, जर्मनी हे चार देश याबाबत आपल्या पुढे आहेत. आपला देश श्रमिकांचा असल्याने यापूर्वी प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद केली जात नसे. आता बँक ट्रान्सफर सारख्या व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार कमी झाला असून दलाली देखील मोठया प्रमाणात संपुष्टात येत आहे.
ते पुढे म्हणाले, आपली अर्थव्यवस्था ही जीवनाशी जोडली गेली आहे. तशा म्हणी देखील आपल्या संस्कृतीत आहेत. आर्थिक क्रयशक्ती वाढ, शेतकरी सबलता आणि उत्पन्नावरील कर व्यवस्था पद्धती जर नीट झाली, तर भारताची अर्थावाय्वस्था चांगली होण्यास मदत होईल. शेती आणि शेतकऱ्यांनी कोविड काळात आपल्याला वाचविले. त्यामुळे देशाच्या बजेटमध्ये शेतीला जास्त महत्व असायला हवे. अल्पभूधारक शेतकरी देशात मोठया संख्येने आहे. त्यामुळे यावर सहकारी शेती हा उपाय असला, तरी राजकारण आणि भांडवलदार यांनी शेतीची नासाडी केली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रकाश असलेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पितालीया यांनी सूत्रसंचालन केले.