सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त वन्यजीव संरक्षक पर्यावरण परिषद आणि पुरस्कार वितरण
पुणे : भारतीय जंगले ही ३० वर्षात मोठ्या प्रमाणात कापली गेली. जंगल आणि प्राणी हे परस्परावलंबी आहेत. त्यामुळे जंगल वाचवायची असतील तर मांस खाणे हे कायद्याने बंद व्हायला हवे. वन्यजीव विषयक कायदे आपण शिकायला हवे. देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही, हे दुर्देवी आहे, असे माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य परिषद पुणे आणि राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण पर्यावरण परिषदेचे आयोजन सोयरे वनचरे सामाजिक संस्था, स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्ट, यांच्या सहयोगाने घोले पाटील रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले. यावेळी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान मुख्य संयोजक विजय वरूडकर, नारीशक्ती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बोराडे, डॉ. हेडगेवार स्मारक सेवा समितीचे कोषाध्यक्ष अभय माटे, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, डी भास्कर, अभय माटे, रमेश अग्रवाल, बापू पाडळकर, गणेश बाकले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार आणि मनेका गांधी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. वन्यजीव रक्षक सर्पमित्र एस.बी.रसाळ, विनय कुलकर्णी, डॉ गणेश गायकवाड, ह.भ.प.कु राजश्री कडगल, बाळ काळणे, सूकेश झंवर यांना विवेकानंद वन्यजीव रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे दिवंगत विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते स्व नारायणकुमार फड यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्ता प्रथम पुरस्कार स्वप्नील गंगणे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यासह योगाचार्य रमेश अग्रवाल लिखित ‘आरोग्य साक्षरता’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
मनेका गांधी म्हणाल्या, अनेक प्राणी संग्रहालय ही अनाधिकृत आहेत, तिथे काम करणारे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे प्राणी व पक्षी प्रेमींनी याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. वन्यजीव, पक्षी प्राणी यांचे संरक्षण केले तरच पर्यावरण समतोल राहील असे त्यांनी सांगितले.
शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे. अंत्यविधी करता लाकूड नाही, तर शेणाच्या गोवऱ्या वापरल्या तर गाय आणि झाडे दोन्ही वाचतील. त्यामुळे गोआधारित शेती प्रशिक्षण सुरु असून गाय वाचली तर देश वाचेल, असेही त्यांनी सांगितले.
गिरीश प्रभुणे म्हणाले, भारत हा प्रतिभावान देश आहे. त्यामुळे त्याचा शोध घ्यायला हवा. पक्षी, प्राणी आणि निर्सगाने समृद्ध असा हा देश होता. त्या गोष्टी आपल्याला आता दिसत नाहीत. परंपरा आणि आधुनिकता मिळून शिक्षणपद्धती राबविणे आवश्यक आहे. तरच प्रतिभावान भारताची पुर्ननिर्मिती होऊ शकेल.
विजय वरुडकर म्हणाले, प्राणी मित्रांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करता याव्या, हा आमचा प्रयत्न आहे. वन्यजीव रक्षक आणि संस्था कार्यकर्ता यांचे फेडरेशन व्हावे, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे परिषदेत वन्यप्राण्यांच्या संरक्षण, वन्यजीव रक्षक यांच्या समस्या व निवारण उपाय यावर विषयी चर्चा व विचारमंथन झाले. वन्यजीव रक्षकांचे राज्य पातळीवर संघटन बांधणी व सक्षमीकरण हे या परिषदेचे महत्व होते, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय विवेकानंद वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे बक्षीस वितरण देखील कार्यक्रमात झाले. सुनील बेनके ज्योत्स्ना वरूडकर, पौर्णिमा इनामदार, सारिका शेठ, विक्रमादित्य शिंदे, विशाल वरूडकर, ऍड कान्होपात्रा गायकवाड, रवींद्र वाघोले, जगदीश गरऋषी, बाबू शिवांगी, उमेश दुगानी, चेतन मराठे, सागर पाटील यांनी कार्यक्रम संयोजन केले.