महा-ध्यान शिबिरात डॉ. संप्रसाद विनोद यांनी दिली जीवनदृष्टी
पुणे – धकाधकीच्या जीवनात ताणतणावांचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करायचे आणि मनाची स्वस्थता कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी जमलेल्या हजारो योगप्रेमींनी प्रत्यक्ष ध्यान करून प्रगाढ शांतीचा विलक्षण अनुभव घेतला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोग-गुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी उपस्थितांना ध्यानाविषयी बहुमोल मार्गदर्शन करून दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व कथन केले आणि जीवनदृष्टी दिली.
निमित्त होते, महर्षि विनोद रिसर्च फौंडेशनच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिरात आयोजित केलेल्या महा-ध्यान शिबिराचे. स्वामी विवेकानंद आणि विश्वशांतिदूत महर्षी न्यायरत्न विनोद यांची जयंती, राष्ट्रीय युवा दिन आणि डॉ. संप्रसाद विनोद यांच्या सुवर्णसाधनेच्या अमृतयोग वर्षानिमित्त हे ‘महा-ध्यान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रख्यात अभिनेता गिरीश कुलकर्णी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुण्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य योगप्रेमी या शिबिरात उत्साहाने सहभागी झालेले होते. त्याचप्रमाणे देशभरातून अनेक योगप्रेमींनी थेट प्रक्षेपणही पाहिले. दोन सत्रांमध्ये झालेल्या या शिबिरात उपस्थितांकडून प्रत्यक्ष ध्यान करून घेण्यात आले आणि ध्यान कसे करायचे याचे बारकावे समजावून सांगितले. सभेच्या ठिकाणी उच्चासनावर बसून उपदेश करण्यापेक्षा खाली उतरून लोकांमध्ये मिसळून डॉ. संप्रसाद विनोद यांनी सर्वांबरोबर मोकळेपणाने संवाद साधला. असा मैत्रीपूर्ण संवाद सगळ्यांनाच मनापासून भावला. त्यामुळे, वातावरणात खूपच मोकळेपणा आला. साहजिकच, कुठलंही दडपण न घेता ध्यानाची प्रक्रिया समजून घेणं आणि ध्यानाची अनुभूती घेणं यात सगळे रमून गेले. प्रगाढ शांती आणि शक्तीचा अनुभव घेऊ शकले.
अतिशय भारलेल्या आणि मोकळ्या वातावरणात पार पडलेल्या महा-ध्यान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समुदायाशी संवाद साधताना डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, “ईश्वर म्हणजे आपल्यामधील चैतन्य. आपल्या अस्तित्वाची आपल्याला होणारी जाणीव. आपण अस्तित्वात असल्यामुळेच विविध शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्रिया करून जगण्याचा अनुभव घेऊ शकतो. आपल्यामधील ह्या चैतन्याची अनुभूती घेणं म्हणजे खरं अध्यात्म आहे. अशी अनुभूती येण्यासाठी मन पूर्णपणे शांत व्हावं लागतं. निर्विचार व्हावं लागतं. ‘मी’ पणा देखील शांत व्हावा लागतो. ‘मी’ पणा शांत झाला, की आपल्यामधील चैतन्याच्या अस्तित्वाची आणि आंतरिक शक्तीची प्रचीती येते. शांतीमुळे स्वत:ला आणि परिस्थितीला समजून घेणं सोपं जातं. शांतीच्या जोडीला आत्मबल असल्यामुळे दोन्हीमध्ये समतोल साधला जातो. रोज योग्य प्रकारे ध्यान केल्याने हे शक्य होते.”
महाध्यानाचा अनुभव घेतल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि आपण परस्परांशी जोडलेलो आहोत याची अनुभूती आनंदाने घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग पोतदार यांनी केले.
मन:शांती हा स्व-भाव होण्यासाठी ध्यान महत्त्वाचे – डॉ. संप्रसाद विनोद
” ध्यान हा योगविद्येचा प्राण आहे. ध्यान बुदधिनिष्ठ आहे. तरीही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. त्यासाठी क्वालिटी टाईम काढावा लागतो. आपले अग्रक्रम बदलावे लागतात. ध्यानातून येणारा मन:शांतीचा अनुभव रोज घेत गेलं, की मन:शांती हा आपला स्वभावच होतो. मग, दैनंदिन जीवनातील समस्यांनी, अडचणींनी आपण गडबडून जात नाही. टिकाऊ मन:शांती लाभली, की कुठलीही समस्या समजून घेणं आणि सोडवणं सोपं जातं. ” असे प्रतिपादन डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले.