रोटरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित ‘टेक टॉक वीक 2025’चा शुभारंभ
पुणे : प्रखर निरीक्षण शक्ती, प्रश्न उपस्थित करण्याची क्षमता, कुतूहल, सर्जनशीलता, कृतिशीलता, प्रयोगशीलता आणि संवाद कौशल्यावर भर देऊन विद्यार्थ्यांनी स्वत:ला विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयआयटी कानपूरचे माजी संचालक, अवंतिका विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री डॉ. संजय धांडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटी, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘टेक टॉक वीक 2025’चे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन आज (दि. 12) डॉ. धांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, रोटेरियन बलबीर चावला, अरुण कुदळे, रोटरी क्लब ऑफ युनिर्व्हसिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे, रोटरी क्लब ऑफ कॅम्पच्या अध्यक्षा वैशाली रावल मंचावर होते. ‘टेक टॉक वीक 2025’ अंतर्गत पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे तसेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
डॉ. धांडे पुढे म्हणाले, जगात आज तांत्रिक क्षेत्रात काय घडते आहे, तंत्रज्ञान कशा पद्धतीने बदलते आहे, त्याच्यातून विद्यार्थ्याने स्वत:ला कसे घडवावे या विषयी आयोजित व्याख्यानांमधून बदलत्या जगाची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे. आजच्या शिक्षणपद्धतीविषयी बोलताना डॉ. धांडे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण शालेय वयापासूनच देणे गरजेचे आहे. साचेबद्ध अभ्यासक्रम न शिकवता आधुनिक तंत्रज्ञानाचीही माहिती विद्यार्थ्यांना योग्य वयात देणे गरजेचे आहे. मुलभूत शिक्षणाचा पाया पक्का असल्यास उच्च शिक्षण घेणे सोपे जाते. कामाप्रती निष्ठा, वचनबद्धता, वक्तशीरपणा, संवादकौशल्य हे गुण आजच्या काळात आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रत्येक क्षेत्र एकमेकांवर अवलंबून असते. यामुळे त्यांचा विचारपूर्वक वापर होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष वापर या काळात तफावत असते. व्यावसायिक क्षेत्रात नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना त्या-त्या वेळी अवगत केल्यास त्यांची कारकिर्द घडणे सोपे होते. ‘टेक टॉक वीक 2025’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत माहिती समजण्यास उपयोग होईल.
डॉ. पराग काळकर म्हणाले, अभियांत्रिकी व शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानात काय बदल घडत आहेत याविषयी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
बलबीर चावला म्हणाले, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून आजच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी तसेच संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी ‘टेक टॉक 2025’ या उपक्रमाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पतर्फे पद्मश्री डॉ. संजय धांडे यांचा तसेच डॉ. सुरेश गोसावी आणि डॉ. पराग काळकर यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती शहा यांनी केले तर आभार डॉ. शंतनू देशपांडे यांनी मानले.
कार्यक्रमाची रूपरेषा
सोमवार, दि. 13 रोजी सायंकाळी 4 वाजता : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी येथे लिडरशीप इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स, मंगळवार, दि. 14 रोजी सायंकाळी 4 वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन येथे हेल्थ केअर ॲण्ड बायो टेक्नॉलॉजी, बुधवार, दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एनर्जी ॲण्ड इको डिझायनिंग-द हार्मनी फोरम, गुरुवार, दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी येथे इनोव्हेटिव्ह इनसाईट्स ॲण्ड अपॉर्च्युनेटिज इन सीडब्ल्यूएस, शुक्रवार, दि. 17 रोजी सायंकाळी 4 वाजता पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे रिॲलिटी रिइमॅजिन्ड : डेटा सायन्स, व्हिआर/एआर इनसाईट्स, शनिवार, दि. 18 रोजी सायंकाळी 4 वाजता एआयएसएसएमएस ॲण्ड सीओईपी ॲट सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी ऑडिटोरियम येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या विषयांवर तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कौशल्याद्वारे विद्यार्थ्यांनी स्वत:ला विकसित करावे : पद्मश्री डॉ. संजय धांडे
Date:

