पुणे, 12 जानेवारी 2025
पुण्यात खडकी मध्ये प्रतिष्ठित बॉम्बे इंजिनियर्स परेड ग्राउंड येथे दक्षिण कमांडने आपल्या लष्करी परंपरा दृगोच्चर करत भव्यदिव्य असा संरक्षण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. या प्रतिष्ठित कार्यक्रमात लष्कराचे जवान आणि तुकड्यांचे अपवादात्मक धैर्य, शौर्य आणि अतुलनीय समर्पण यांचा यथोचित सन्मान करत त्यांच्या राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल 34 वैयक्तिक पुरस्कार आणि 27 युनिट प्रशस्तिपत्रे बहाल करून त्यांना गौरवण्यात आले.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, अति विशिष्ट सेवा पदक, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. 08 सेना पदके (शौर्य), 09 सेना पदके (विशेष सेवा), 14 विशिष्ट सेवा पदके, 02 विशिष्ट सेवा पदके आणि बार, एक उत्तम जीवन रक्षा पदक आणि 27 जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ युनिट पदोन्नती पुरस्कारांसह संपूर्ण कमांडमधील युनिट्सच्या उत्कृष्ट प्रयत्नांचा गौरव करत प्रतिष्ठित पुरस्कारांच्या सादरीकरणाद्वारे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.
उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्याचा रिवाज म्हणून लष्कराच्या कमांडरने विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित दिग्गजांचा त्यांच्या निवृत्तीनंतरच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार केला. सक्रिय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही या व्यक्तींनी सामाजिक कल्याणाच्या हेतूने समर्पण भावनेने निःस्वार्थरित्या राष्ट्रसेवा करत राहिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
खडकी येथील बीईजी केंद्र येथे आयोजित या सोहळ्यात लष्करी अचूकता, शिस्त आणि राष्ट्राभिमानाचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या कवायतीत भारतीय सैन्याच्या विविध पलटण केंद्रांच्या आठ प्रतिष्ठित कवायत तुकड्यांसह प्रभावी मानवंदना कवायतींचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रगत शस्त्रे, लढाऊ वाहने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह भारतीय लष्कराच्या तांत्रिक पराक्रमाचेही प्रदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय संरक्षण आणि विकासासाठी भारतीय सैन्याच्या योगदानाचा एक महत्त्वाचा पैलू दर्शविणारे प्रत्येकी एक असे चार चित्ररथ देखील होते. यामध्ये लष्कराचा मिशन ऑलिम्पिक उपक्रम, राष्ट्र उभारणीत दिग्गजांची महत्त्वाची भूमिका, नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठीची वचनबद्धता आणि आधुनिक भारतीय सैन्याला आकार देणारी तांत्रिक प्रगती यासारख्या संकल्पनांचा समावेश होता.
पुण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या सैन्य दिवस परेडच्या अनुषंगाने यंदाची इन्व्हेस्टिचर परेड काहीशी विशेष गणली गेली. यामुळे लष्करी क्रियान्वयनासाठी आकारात येणाऱ्या नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची दुर्मिळ संधी जनतेला प्राप्त झाली. उल्लेखनीय प्रदर्शनांमध्ये रोबोटिक म्युल्स, शत्रूचे स्थान निश्चित करणारे आणि परिमिती सुरक्षेसाठी बनवण्यात आलेले चतुष्पाद मानवरहित ग्राउंड व्हेइकल आणि स्वाथी शस्त्रास्त्र स्थान निश्चिती रडार, प्रतिकूल तोफखान्याचा अचूक मागोवा घेण्यास आणि प्रभावी प्रतिकार करण्यास सक्षम असलेली अत्याधुनिक प्रणाली यांचा समावेश आहे.