पक्षांनी पुनर्बांधणी केली पाहिजे :डॉ.कुमार सप्तर्षी
गांधी दर्शन शिबीरास चांगला प्रतिसाद
पुणे:’निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे पैशाचे वर्तृळ तोडणे अवघड झाले आहे.आता ही विचारांची लढाई राहिली आहे का,हा प्रश्न आहे.पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवला गेला,सर्वोच्च न्यायालयाकडून निराशा झाली. लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली.हे पाहता लोकशाही उरलेली नाही,हे स्पष्ट होते’, असे परखड प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण( सद्य राजकीय स्थिती),मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे(गांधी,आंबेडकर आणि संविधान),आणि प्रा. नितीश नवसागरे(वन नेशन,वन इलेक्शन) यांनी मार्गदर्शन केले.’ गांधी दर्शन’ विषयावरचे हे १७ वे शिबीर होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,’ विधानसभा निवडणुकाचा निकाल धक्कादायक होता. काँग्रेससह अनेकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास उरला नाही. निवडणूक आयोग निःपक्ष असला पाहिजे. तरच लोकशाहीला अर्थ राहिल. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला.हे पाहता लोकशाही उरलेली नाही,हे स्पष्ट होते. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे पैशाचे वर्तृळ तोडणे अवघड झाले आहे.आता ही विचारांची लढाई राहिली आहे का,हा प्रश्न आहे.पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवले गेला,सर्वोच्च न्यायालयाकडून निराशा केली. लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली.
ते म्हणाले,’पक्षांतरबंदी कायदा टाकून पक्षांतर केल्यास पक्षाचे सदस्यत्व तात्काळ रद्द होईल असा स्पष्ट कायदा केला पाहिजे. निवडणूक खर्च, निवडणूक आयोग, निवडणुक आचारसंहिता यावर गंभीर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे’.
‘घटनाकारांना अभिप्रेत लोकशाही उरली नाही,हे मान्य केले पाहिजे. संसदेत चर्चा करून बदल होत नाहीत.आता विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत,अशी पावले आता सत्ताधारी पक्ष उचलत आहे.राजकीय पक्षांना विरोधी पक्ष म्हणून काम करता येणे अवघड होणार आहे, महाविकास आघाडीत कुरबूर आहे. त्यातून विरोधी पक्ष संक्रमणावस्थेतून जात आहे, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे’,असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,’राजकीय पक्ष दुबळे झाले आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या बनल्या आहेत. पक्षांतर्गत लोकशाही उरलेली नाही.सर्वच पक्षात अशी अवस्था आहे. लोकशाहीचा आत्मा संपण्याच्या अवस्थेत आपण पोचलो आहोत’.
‘दुसरीकडे विकसित भारताचे दावे हास्यास्पद बनले आहे.आताच्या विकासदराने ते होणे शक्य नाही. शिक्षण, आरोग्यावर खर्च न केल्याने मनुष्यबळ विकास शक्य नाही.बेरोजगारी हा भयंकर प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रात राजाश्रयाने खंडणीची व्यवस्था बनली आहे. आता उद्योग महाराष्ट्रात येणे अवघड आहे.दरडोई उत्पन्नात आपण १७ व्या स्थानावर पोचल्याची भीती आहे ‘, असेही ते म्हणाले.
डाॅ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’सामाजिक संस्थांनाच सद्यस्थितीची चिंता वाटत नसून राजकीय पक्षांनाही वाटत आहे. निराश होऊन चालणार नाही.प्रत्येक पिढीला तत्कालिन उत्तरे शोधली पाहिजेत.
हिंदूराष्ट्र येऊन प्रश्न सुटणार नाही, कारण जेव्हा हिंदूराष्ट्र होते, तेव्हाही प्रश्न सुटले नव्हते. पुराणात न जाता विवेकाने पाहिले पाहिजे.आताच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वातंत्र्य संग्रामात आहे.सद्यस्थितीत हताश न होता, विचारमंथन करत कृती करत पुढे गेले पाहिजे.पक्षांनी पुनर्बांधणी केली पाहिजे.गांधींना न विसरता वाटचाल केली पाहिजे ‘.
गांधी-आंबेडकर यांच्यात शत्रूभाव नव्हता: डॉ.आनंद तेलतुंबडे ..
आनंद तेलतुंबडे म्हणाले,’सर्वांनी विचार करुन घटना लिहिली. ही घटना सर्व मिळून विचार समूह आहे.अशी घटना पुन्हा लिहिली जाणार नाही.गांधी आणि आंबेडकर स्वतःला महामानव मानत नव्हते. दोघांचे विचार भिन्न होते. घटनेवर गांधी यांचा प्रभाव आहे.
आताच्या प्रश्नांवर विचार करताना मार्क्स, गांधी, आंबेडकर यांना समजून घेतले पाहिजे. गांधी स्थितीवादी आहेत,आंबेडकर हे सुधारक आहेत आणि मार्क्स क्रांतीकारक आहेत.त्यातील काय घ्यायचे, काय सोडायचे हे ठरवले पाहिजे. त्यांच्यात शत्रूभाव मानण्यात अर्थ नाही.काही मतभेद असले तरी दुराभाव नव्हता. आपापल्या अस्मितेचे झेंडे उंचावण्यात अर्थ नाही,असेही ते म्हणाले.
‘आंबेडकर हे कौटिल्य नंतर महान अर्थ शास्त्रज्ञ होते. गांधीजीना स्वतःची शक्तीस्थळे,दौर्बल्यस्थान माहित होते. ते स्थितीवादी होते.ते भांडवलशाहीच्या विरोधात नव्हते. समाजात कलह नसावा असे ते मानत होते. ते जाती व्यवस्थेच्याही विरोधातही नव्हते, पण त्यांना उतरंड नको होती. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर हे सुधारक होते.प्रत्येक समूहाला प्रतिनिधीत्व देणारी संसदव्यवस्था हवी आहे. जिंकणारा व्यक्ती लोकप्रतिनिधी होणे ही लोकशाही नाही. धनदांडगे,गुन्हेगार निवडून जाणे याला अचूक पर्याय दिला पाहिजे. क्रांती घडून येणे वगैरे शक्यतेच्या आवाक्यातील गोष्ट नाही’, असेही तेलतुंबडे यांनी सांगितले.
डॉ.प्रवीण सप्तर्षी,अन्वर राजन, अॅड.स्वप्नील तोंडे, कमलाकर शेटे,कॉम्रेड अॅड.सयाजी पाटील,विकास लवांडे,अजय भारदे, अरुण खोरे, मिलिंद गायकवाड, सुनीती सु.र., इब्राहिम खान,संग्राम खोपडे,अप्पा अनारसे,सुदर्शन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते.