दिल्लीतील साहित्य संमेलनानिमित्त शरद पवार यांनी साधला साहित्यिकांशी संवाद
पुणे : देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे. या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळेल. राजधानीत होणारे हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असा विश्वास ज्येष्ठ नेते आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. सध्या महाराष्ट्र संकटात आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा साहित्यिकांशी संवाद हा उपक्रम आज (दि. 11) घेण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहबे कसबे, साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे संयोजक संजय नहार, घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरहद, पुणेचे विश्वस्त शैलेश वाडेकर मंचावर होते.
पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, उदगीर येथे झालेल्या साहित्य संमेनलाचे अध्यक्ष भारत सासणे, संमेलनाचे आंतराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतिश देसाई यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आनंदाने स्वीकारले असल्याचे अधोरेखित करून शरद पवार यांनी जेथे संमेलन होणार आहे त्या तालकटोरा स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर अनेक मराठी जनांनी दिल्लीत वास्तव्य केले असल्याचे सांगून त्यांच्या पुढील पिढीतील घरांमध्ये आजही जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र पहायला मिळते. सध्या माझे वास्तव बराचकाळ दिल्लीत असल्याने संमेलनाच्या निमित्ताने येणारी मंळडी हे माझे सगेसोयरे, बांधव आहेत याचा आनंद आहे.
पवार पुढे म्हणाले, किल्लारीचा भूकंप, मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर उसळलेली दंगल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर या काळात महाराष्ट्रात उद्भवलेली परिस्थिती हाताळताना साद दिली की लोक साथ देतात हे मराठी मंडळींचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले. सध्या महाराष्ट्रात दहशत-भीतीचे वातावरण आहे अशा काळात मराठी बांधवांमध्ये ऐक्य राहणे गरजेचे आहे. यातून महाराष्ट्राची स्थिती लौकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास दर्शवत पवार पुढे म्हणाले, साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला या संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पुण्यातही सध्या मराठी बोलले जात नाही, हिंदीत बोला असा आग्रह पुण्यातील उपनगरामंध्ये केला जातो. मराठी भाषा टिकावायची असेल तर मराठी भाषा सक्तीची करावी, असा मुद्दा प्रेक्षकांमधून उपस्थित झाल्यानंतर तुमचा निरोप मी उद्धव ठाकरे यांना देतो अशी मिश्लिक टिप्पणी पवार यांनी केली.
रावसाहेब कसबे म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वारशाची जपणूक करणारे नेते म्हणजे शरद पवार होय. पवार यांच्या भोवती नेहमीच साहित्यिकांचा गोतावळा असतो. सर्वसमावेशक अशा राष्ट्रवादाचे पवार समर्थक असून असा राष्ट्रवाद नेहमीच समाजाबरोबर उभा राहतो.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, शरद पवार हे राजकारणातील पंढरी दुमदुमवून साहित्य पंढरीत आलेले नेते आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर साहित्य, संस्कृती आणि कलेशी शरद पवार यांनी नाळ जपली आहे. लेखन परंपरा, संगीत, नाटक, कला क्षेत्रात काय घडते आहे, याविषयी शरद पवार नेहमीच अवगत असतात.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी कृतिशील व्यक्ती म्हणजे शरद पवार होय. शरद पवार यांनी सामाजिक ऐक्यासाठी मोठे काम केले असून त्यांचे साहित्याशी देखील जवळचे नाते आहे. महाराष्ट्रात एकमेकांमध्ये भेद असला तरी दिल्लीत जाताना आम्ही एक आहोत अशी भावना त्यांच्यात असते. समाजात ऐक्य भावना कमी होत असताना शरद पवार यांची संवादात्मक भूमिका पिढ्यानुपिढ्या आदर्श राहिल.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, मराठ्यांचा दिल्लीशी निकटचा संबंध आहे. मराठ्यांचे राज्य हे नेहमीच प्रेमाचे होते. दिल्लीवर राज्य केलेले महादजी शिंदे हे उत्तम साहित्यिक होते. साहित्य, संस्कृती आणि सत्ता एकत्रितपणे महाराष्ट्रात नांदतात आणि त्याचे प्रतिक म्हणजे शरद पवार आहेत.
भाषा, संगीत, नाट्य, ज्ञानविज्ञान, अध्यात्म, कृषी परंपरा आदी क्षेत्रात रमणारे आणि कलावंतांचा सन्मान करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार होय, असे डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. वंदना चव्हाण यांनी मानले. सुरुवातीस शरद पवार यांचा सत्कार डॉ. रावसाहबे कसबे, प्रा. मिलिंद जोशी, संतोष बालवडकर आणि अनुज नहार यांनी केला.
.