योगाद्वारे उच्च दर्जाचे आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिकपटू घडवणार : मुख्याध्यापिका धनावडे
पुणे : विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे, या उद्देशाने डीईएस प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या वेळेस क्रीडा क्षेत्रात काही अनोखे करण्याच्या उद्देशाने डीईएस प्राथमिक शाळेत दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी व पालक प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतच्या विविध योगांचे प्रात्यक्षिक दाखवून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
या विश्वविक्रमा संदर्भात सविस्तर माहिती देताना मुख्याध्यापिका धनावडे बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला सीमरन गुजर, प्रोजेक्ट मॅनेजर ग्रेसी डिसूझा, क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे आणि योगा उपक्रमाचे सल्लागार डॉ. मिलिंद संपगावकर आदी उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष अंड. राजश्री ठकार यांचे ही या उपक्रमांस सहयोग लाभले आहे.
या वेळी बोलताना मुख्याध्यापिका धनावडे आणि उपस्थित शिक्षिकांनी सांगितले की, या योगा विश्वविक्रमात विद्यार्थी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड योग, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, तालीयोग, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योग, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा सादर करणार आहेत. या कार्यक्रमात पालकांच्या ढोलताशा पथकाचे संचलन पालकांद्वारे सादर होईल. शंखनाद करून कार्यक्रमाची सुरवात होईल व त्यानंतर सरस्वती पूजन झाल्यानंतर विद्यार्थी विविध योगासने सादर करतील.
कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे आम्ही योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्टया तंदुरुस्त आणि बौद्धिक दृष्ट्या तल्लख बनवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी योगा क्लासेसची सुरवात केली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. हा विश्वविक्रमाचा उपक्रम त्याचीच एक प्रचिती आहे. या माध्यमातून आमचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिकपटूदेखील घडवण्याचा मानस आहे.डाॅ. मिलिंद संपगावकर यांनी सांगितले की, १५० मिनिटांमध्ये विद्यार्थी हे ३० अॅक्टिव्हिटी सादर करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शाळेने पालकांनादेखील यामध्ये सामावून घेतल्यामुळे आज त्याचा खूपच सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे.