पुणे-पुण्याची उमेदवारी दिल्लीतून ठरेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले तर याच वेळी ,पुण्याचा उमेदवार आल्या आल्या त्याचे जोरात काम सुरु होईल अशी ग्वाही देताना, ‘आपण कोंबडी लगेच शिजायला टाकतो काय ,आधी तयारी करतो , आम्ही मसाला ,कांदा सगळा तयार करून ठेवलाय .. आल्या आल्या जोरात काम करू’ अशा विनोदी शैलीत पुण्याच्या उमेदवाराच्या नावास होत असलेल्या विलंबा बाबत टिप्पणी केली .
आज पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामांबाबत ,अडचणीबाबत कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार ,विश्वजित कदम ,संग्राम थोपटे ,संजय जगताप,उल्हास पवार आदी नेत्यांची संयुक्त बैठक झाली . आघाडीतील दोन्ही पक्षांच्या मधील मतभेदाचे ,चढाओढी चे राजकारण थांबवून भाजपचा सामना करायचा हा त्यामागील उद्देश होता .बारामती लोकसभेमध्ये आगामी विधानसभेची गणिते दडली असून इंदापूर, पुरंदर आणि भोर हे मतदारसंघ विधानसभेसाठी काँग्रेसला सोडण्याबाबतचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. हा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल, असा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत काँग्रेसच्या इच्छुकांची समजूत काढण्यात पवार यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजित कदम, संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी बैठकीस उपस्थित होते. पाटील यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व शक्यतांवर जोरदार चर्चा झडली. आघाडीमध्ये इंदापूर आणि भोरची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्यामुळे आघाडीचा निर्णय घेताना इंदापूरची जागा कोणाला सोडण्यात येणार, याबाबत स्पष्टता असली पाहिजे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. पुरंदरला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सलग दोन वेळा पराभूत झाल्याने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी जगताप यांनी केली. भोरची जागा काँग्रेसचीच असून, ती जागाही आगामी निवडणुकीत काँग्रेसकडेच राहील, याची हमी देण्यात यावी अशीही मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.
इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, अशी गळ हर्षवर्धन पाटील यांनी राहुल गांधी यांना घातली आहे. गांधी यांच्याशी इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. ही जागा काँग्रेसची होती आणि तेथून काँग्रेसच निवडणूक लढेल, असे आश्वासन गांधी यांनी दिल्याचे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे इंदापूरच्या जागेबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आता पवारांकडूनही शब्द सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्द दिला नसला, तरी यापुढे भविष्यात इंदापूरमध्ये आघाडीवरून राष्ट्रवादीकडून वक्तव्ये होऊ नयेत, याचा बंदोबस्त पाटील यांनी केल्याची चर्चा आहे.
यावेळी पाटलांचे स्नेहभोजन उरकल्यावर या नेत्यांनी माध्यम प्रतीनधींशी संवाद साधला ,यावेळी पहा हे नेते काय म्हणाले …
(संपूर्ण अनकट संवाद https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2445556109022326/ या आमच्या फेस बुकच्या mymarathi.net च्या पेजवर लाइव्ह केलेला आहे )