एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा
परम लखानी एमआयटी डब्ल्यूपीयू पीस कींग व पीस ऑफ क्वीनचा मुकुट सायली डोईफोडेला
पुणे, दि. १५ फेब्रुवारी:“खरे सौंदर्य हे बुद्धीमत्तेत आहे. त्यामुळे बुद्धिच्या सौंदर्यांनी सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून प्रेम करा. प्रेम ही एक शाश्वत शक्ती असून संतांनीही त्याची व्याख्या केली आहे. या जीवनात सर्वांवरच प्रेमाचा वर्षाव व्हावा.” असे विचार माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्याने आयोजित केलेल्या ब्रिलियंटाईन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड होते. याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. मिलिंद पात्रे आणि सह्याद्री वाहिनीचे माजी संचालक मुकेश शर्मा उपस्थित होते.
भारतीय संस्कृती, परंपरा, पौराणिक कथा, अध्यात्म, धर्म, योग व इतिहास इ. विषयांवर निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या मध्ये २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘ब्रिलियंटाईन’ स्पर्धेत परम लखानी (स्कूल ऑफ मिडिया अॅण्ड जर्नालिझम) यांना एमआयटी डब्ल्यूपीयू पीस कींग व सायली डोईफोडे (स्कूल ऑफ मॅथेमॅटिक अॅण्ड स्टॅटेस्टिक्स) यांना एमआयटी डब्ल्यूपीयू पीस ऑफ क्वीनचा मुकुट घालून विशेष सत्कार करण्यात आला. सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिले. तसेच, या स्पर्धेतील पुरूष उपविजेते वेदांत काळे (स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनियरींग), प्रणय करकाळेे(स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनियरींग) आणि महिला उपविजेता सिद्धी देशमुख (स्कूल ऑफ मॅनेजमेंट यूजी, टीवाय बीबीए) व वैष्णवी बावठनकर (फॅकल्टी ऑफ लिबरल आर्ट) यांचाही सत्कार करण्यात आला. हे सर्व विजेते एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विश्वशांती उपक्रमांचे नेतृत्व करतील व इतर महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये त्याचा प्रचार व प्रसार करतील.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले,“ खरे नाते हे मित्राचे असते. या नात्याला अध्यात्मात सुद्धा खूप मोठे स्थान दिले गेले आहे. वर्तमान काळात व्हॅलेंटाईन डे ला मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या पासून स्वतःचा सांभाळ करावा. माणसाच्या माणुसपणाचे खरे सौंदर्य हे बुद्धिमत्तेतच दिसून येते.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“आंतरिक परिवर्तन हे जीवनात मोठे बदल घडवितात. व्हॅलेंटाईन डे हा आंतरिक प्रेमाचा दिवस आहे. हा दिवस बुद्धिमत्तेचा म्हणजे विद्वतेसाठी साजरा केला जावा. ज्ञानमुळे जीवनात बदलत होत जातात. त्यासाठी ज्ञानला महत्व दिले जावे. भगवद गीतेसारख्या ग्रंथांचे अनुकरण केल्यास परिवर्तन नक्कीच घडते. त्यातून आनंद निर्माण होतो.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“वर्तमानकाळात प्रेमाची भाषा बदलत चालली असून त्यात मन आणि बुद्धि महत्वाची आहे. आजची पिढी कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे हे पहाणे गरजेचे आहे. त्यातच कुटुंब व्यवस्था ही भरकटत आहे. या साठी ब्रिलियंटाईन डे ही संकल्पना समाजाला नवी दिशा देईल. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये हे आम्हाला धर्म शिकवितात. त्या आनंदाचा अनुभूव घ्यायचा असेल तर शाश्वतमार्गावर चालावे. विद्यार्थ्यांनी असा व्यवहार करावा की आपल्या आई वडिलांना त्यांचा अभिमान वाटावा.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, ब्रिलियंटाइन स्पर्धा केवळ शारीरिक रुपाला व दिसण्याला महत्व न देता बुद्धिला व स्वतःच्या अस्तित्वाला महत्व दिले जावे यासाठी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना व आव्हान देणे महत्वाचे होते.
परम लखानी म्हणाले,“स्पर्धेमुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे. यातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. पुरस्कारामुळे मला खूप आनंद झाला.”
सायली डोईफोडे म्हणाल्या,“माझ्या जीवनात शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मिळालेला अनुभव भावी आयुष्यासाठी मैलाचा दगड ठरेल. ”
यावेळी मुकेश शर्मा यांनी आपले विचार मांडले.
पीस स्टडीजचे प्रा.आशिष पाटील व प्रा.मृण्मयी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.