‘टिंचिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट’ कार्यशाळा संपन्न
पुणे, दि. ४ जानेवारी: “ शिक्षकीपेशा हे सतीचे वाण आहे म्हणून शिक्षकांनी ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसारास वाहून घेणे आवश्यक आहे. त्यांनी ज्ञान उपासना केल्यास त्यांच्या वाणीत चैतन्य येते. अनुभवात्मक शिक्षण पद्धत ही एक महत्वपूर्ण व प्रभावी पध्दत ठरू शकते.”असे विचार प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन तर्फे ‘टिंचिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट’ या विषयावर संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लिबरल आर्ट्स एमआयटी डब्ल्यूपीयू चे डीन प्रा. डॉ. संतोष कुमार हे उपस्थित होते. तसेच डॉ. शालिनी टोणपे व सह प्राध्यापिका प्राची सोमवंशी उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“अनुभवात्मक शिक्षण पद्धतीत लक्ष्य निर्धारणापासून, अवलोकन आणि अनुभव घेण्यापर्यंत ते पुनरावलोकन करून शेवटी योजना अमलांत आणावी. ही संपूर्ण प्रक्रिया नवीन कौशल्ये शिकवित, नवा दृष्टिकोण व अगदी संपूर्ण नवीन विचारसरणी देखील देते. शिक्षकांमध्ये निर्धार, योजकता, कल्पकता व जबाबदारीची जाणीव आणि नवीनतेची आस असावयास हवी. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रउभारणीच्या क्षमता निर्माण करणे हा अध्यापनाचा उद्देश असतो.”
“आदर्श शिक्षकांसाठी त्यांचे आरोग्य चांगले असल्यास ते आपले कर्तव्य चोखपणे पार पाडू शकतात त्यांच्यामध्ये उत्साह असल्यास ते इतरांमध्ये उत्साह निर्माण करू शकतात . त्याच प्रमाणे भावनिक स्थिरता, स्वारस्य आणि उत्साह, सहानुभूती, उच्च स्वर, संयम आणि सहिष्णुता, भाषा, सामाजिकता, नेतृत्व क्षमता आणि वेळेची नियमितता असावी. त्यांनी सदैव हसत खेळत शिक्षणाचा प्रसार करावा.”
सर्व शिक्षक वृंदासाठी निःशुल्क आयोजित कार्यक्रमात पुणे शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक अशा २०० पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागींना ई प्रमाणपत्र देण्यात आले.
डॉ. संतोष कुमार यांनी संवाद साधण्यासाठी भाषेचे महत्व किती अनन्य साधारण आहे, हे समजावून सांगितले. तसेच स्वागत पर भाषण केले.
डॉ. शालिनी टोणपे यांनी सूत्रसंचालन केले. सह प्राध्यापिका प्राची सोमवंशी यांनी आभार मानले.