पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक पथ इथल्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक वेशभूषा या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रकल्पाबरोबरच या नाविन्यपूर्ण स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञ , वैज्ञानिक मॉडेल्स , वैज्ञानिक साहित्यांच्या माहितीची वेशभूषा करून आपण करत असलेल्या भूमिका सादर केल्या. केवळ पुस्तकातून शिकल्या जाणाऱ्या वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांनी सोप्या करून सांगितल्या. संकल्पना विद्यार्थ्यांनी सोप्या करून सांगितल्या.
आपल्या जीवनात विज्ञान हा अविभाज्य भाग असून प्रत्येक क्रियेला काहीतरी कारण असते आणि आजच्या विज्ञानवादी युगात प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेऊन मगच त्याचा स्वीकार किंवा अस्वीकार केला पाहिजे असे मत मुख्याध्यापिका सौ लिना तलाठी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. स्पर्धा ही केवळ गंमत म्हणून घ्यायची नसून त्यातून अभ्यासही झाला पाहिजे असेही तलाठी यांनी पुढे सांगितले.
इयत्ता 8वी मधून सौमित्र मांडके याने प्रथम , यश गुरव द्वितीय तर बिल्वा भंडगे आणि अलका जोशी यांना तृतीय क्रमांकाचे तर अनन्या काळोखे , कादबाने भार्गवी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. मोहनिश वाणी आणि गंधर्व नागवेकर यांना विशेष पारितोषिक मिळाले. नववी मध्ये पूर्णा गोखले , निधी घारे , साक्षी कदम आणि कादंबरी दळवी यांच्या गटाला प्रथम पारितोषिक तर विनिता कुलकर्णी हिला द्वितीय पारितोषिक मिळाले. तर नववीच्या ईशान कुलकर्णी याला विशेष पारितोषिक मिळाले.
विज्ञान शिक्षिका सोनल एरंडे , मीनल मानकर , श्रद्धा साळवेकर आणि दीप्ती यादव यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.