पुणे- महापालिकेतील स्थायी समिती मध्ये ३२३ रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी सुरु असलेला प्रयत्न म्हणजे ठराविक बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार असून ,यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे असा आरोप करीत ९ मित्र रुंदीचे रस्ते करण्याऐवजी सर्वच सहा मित्र रस्त्यांवर टीडीआर लागू करावा , खालचे २ मजले पार्किंग चे सोडून त्यावर इमारतीची उंची मोजली जावी अशी मागणी आज शिवसेनेने पत्रकार परिषदेतून करत भाजप आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर या प्रकरणी प्रहार केले आहेत .सेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, सेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार ,माजी नगरसेवक शाम देशपांडे ,प्रशांत बढे यांनी आज महापालिकेत पत्रकार परिषद घेतली . यावेळी ते म्हणाले,’ पालिकेत २०१७ पासून भाजपची सत्ता आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तेव्हा 6 मीटर रस्त्यावर टीडीआर द्यायला मनाई करूनच पुण्याच्या तिजोरीवर आणि पुणेकरांवर अन्याय केला . शहराचा विकास आराखडा मंजूर करताना नागरिकांपेक्षा त्यांनी बिल्डरांचे हित जोपासले. सध्या आता 6 मीटर चे केवळ निवडक ३२३ रस्ते ९ मीटर रुंद करून पुन्हा काही बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचा यत्न होतो आहे. यामुळे अनेक सर्वसामान्यांच्या जागा या बांधकाम योग्य उरणार नाहीत आणि त्या आपोआप बिल्डरांच्या घशात घातल्या जातील . त्यापेक्षा जेवढे 6 मीटर रुंदीचे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांवर टीडीआर देण्यात यावा . आणि त्यांना नियमानुसार २ माजले पार्किंग चे बंधन घालण्यात यावे.