पुणे-जोपर्यंत सरकार आणि समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत कोणतेही सरकार आले तरी नदी पुनरुज्जीवन यशस्वी होऊ शकणार नाही. जेव्हा समाज ठरवतो तेव्हा सरकारपेक्षा शंभर पट काम करू शकतो. त्यामुळे नदी पुनरुज्जीवनासाठी सरकारवर अवलंबून न राहता समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘नदी की पाठशाला’ या उपक्रमाचे उद्घाटन करताना सिंह बोलत होते. फर्ग्युसन, जलबिरादरी, वनराई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, कृषी विद्यापीठाचे सुनील भासाळकर, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारीया, सुमंत पांडे, अमित वाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सिंह पुढे म्हणाले, नदीच्या उगमापासून विविध टप्पे समजावून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर नदीची पाठशाळा आणि नदी प्रदूषित होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नदीच्या जीवनाला आपल्या जीवनाबरोबर जोडून ती आरोग्यसंपन्न केली पाहिजे. आमच्या पिढीने नदीची दुरावस्था केली आहे. पृथ्वी, निसर्ग आणि मानवाने एकमेकाचा आदर केला पाहिजे, नाही तर जीवन राहणार नाही. केवळ तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमुळे विकास होणार नाही. आपण व्यवहाराने निसर्ग वाचविला पाहिजे. भावी पिढीने जल साक्षरतेची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी विविध विभागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी नदीबरोबरचे नाते दृढ केले पाहिजे. ही चळवळ झाली पाहिजे.
डॉ. करमळकर म्हणाले, प्रत्येक महाविद्यालयाने राम नदीसारख्या छोट्या नद्यांची जबाबदारी स्वीकारली तर पुढील पाच ते दहा वर्षांत नद्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सातत्यपूर्ण आणि सक्रिय सहभाग राहणार आहे.
डॉ. परदेशी यांनी स्वागत, सुमंत पांडे यांनी प्रास्ताविक. अक्षता देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि अमित वाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.