पुणे – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पुण्यात पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पडळकर यांचा बोलविता धनी भाजप आहे. हा पक्ष दुतोंडी आहे. त्यामुळे पडळकर नव्हे तर भाजपने माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. नेते जयदेव गायकवाड, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रकाश म्हस्के, महेश हांडे, राकेश कामठे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
सध्या भाजप व त्या विचारधारेतील मंडळींना सत्ता गेल्याने मानसिक रोगाने पछाडले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर ज्यांची बोलायची लायकी नाही, असे अनेक लोक गेले काही दिवस भ्रमिष्ट झाल्यासारखे बरळत आहेत. यातून ते लवकर बरे व्हावेत, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत.
सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय अशा या वर्तणुकीचा व वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.
तर, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त करून जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.
किमान आता तरी त्यांनी जपून आणि भान ठेवून बोलावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पडळकरांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला..