पुणे- भाजपच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांनी २ दिवसात बैठकांचा सपाटा लावला आणि प्रत्येकाने आपापल्या परीने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नावे कळविण्यात आली असून अवघ्या काही तासात फडणवीसांची पसंती पुण्याला समजणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार मुरलीधर मोहोळ यांना महापौर पदासाठी उमेदवारी मिळेल असे समजले आहे तर उपमहापौर पदासाठी आरपीआय ला डावलून मानसी देशपांडे यांची नेमणूक करण्याबाबत स्थानिक नेत्यांनी आग्रह केला असला तरी नेमके फडणवीस त्यावर काय निर्णय घेतात हे लवकरच समजणार आहे.
गेल्या आठवड्यात महापौरपदाचे आरक्षण मुंबईत जाहीर झाले. या आरक्षणात पुण्याचे महापौर खुल्या गटासाठी राखीव झाले. त्यामुळे महापौर म्हणून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता पक्षामध्ये होती. भारतीय जनता पक्षाच्या शहराच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. त्यातून, पक्ष नेतृत्वाकडे काही मोजक्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव अग्रस्थानी आहे. या शिवाय अन्य नावात धीरज घाटे, राजेन्द्र शिळीमकर , हेमंत रासने,वर्षा तापकीर यांची नावे पाठविण्यात आली आहेत .उपमहापौर पद हे भाजप कडेच ठेवावे यासाठी शहराध्यक्षा यांनी आग्रह धरलेला आहे. महापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी सकाळी ११ ते दुपारी एक या दरम्यान आहे. पालिकेमध्ये भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्याने शिवसेनेने विरोधकांना साथ दिली, तरी आज सोमवारी अर्ज भरणारा भाजपचा उमेदवारच महापौरपदाच्या खुर्चीत बसणार, यात शंका नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेना, मनसे यांच्या आघाडीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार अशी लढत झाली तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे , त्यात सर्वांची पक्षाबाबत बांधील राहून आदेश मानण्याची परंपरा आहे .त्यामुळे कोणीही नगरसेवक अगर नगरसेवकांचा गट निवडणुकीला अनुपस्थित रहाणे शक्य नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.