पुणे, दि. २८ जुलै २०२२: थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. ३०) व रविवारी (दि. ३१) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.
वारंवार आवाहन करूनही थकबाकीचा भरणा करीत नाही अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमिवर पुणे परिमंडलातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. ३०) व रविवारी (दि. ३१) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.