पुणे : देशाच्या राजधानीत सूरू असलेल्या कुस्तीगीर महिलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अभिव्यक्तीकडून शहरात विविध ठिकाणी जनजागृती अभियाने राबवली. डी मार्ट, वारजे, महात्मा गांधी रस्ता, पुणे कॅम्प आणि कलाकार कट्टा इथे राबवली गेली.
यावेळी पुणेकर नागरिक-विद्यार्थी-विद्यार्थिनी-महिला यांच्याशी या घटनेला धरून महिला संघटनांच्या असणाऱ्या विविध मागण्यांविषयी चर्चा झाली. जसं एखादी महिला म्हणत असेल की तिच्यावर अत्याचार झाला आहे, तर हो झाला आहे. तिच्यावर अत्याचार कधी झाला आणि ती आत्ता बोलतेय हे गौण मुद्दे आहेत. राजकीय रंग देण्याआधी ती महिला माणूस असून तिचा मानभंग झाला आहे, खेळाडू महिलांवर ही परिस्थिती ओढवत असले तर देशातल्या सामान्य महिलेने कुठे आणि कशी दंड मागायची यावर नागरिक चर्चा करत होते. एकूणच या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानिमित्ताने संबंधित घटनेविषयी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने महिला कुस्तीगीरांवर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात सरकारने कोणतीच कायदेशीर कारवाई केलेली नाही याचा अभिव्यक्ती संघटना तीव्र निषेध करत आहे. या अन्यायाविरोधात कुस्तीगीर महिलांनी वाचा फोडत उभ्या केलेल्या लढ्याला अभिव्यक्ती संघटना पाठिंबा व्यक्त करत आहे. या खेळाडूंच्या सत्काराच्या वेळी मात्र या महिला खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत, अशी खोटीच कौतुकाची थाप द्यायची, बेटी बचाओ बेटी पढाओ, मातृवंदन, नारी शक्ती अशी विशेषणे वापरायची आणि वास्तवात मात्र स्त्रियांच्या संरक्षणासाठी कोणतीही आवश्यक ठोस कृती करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या आणि स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू आहे अशा विचाराच्या या सरकारचा अभिव्यक्ती संघटना निषेध करते आहे. ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर आरोपींना त्वरित अटक करावी, सर्व क्रीडा महासंघ आणि क्रीडा संकुल, या ठिकाणी लैंगिक छळ विरोधी कायद्यांतर्गत समित्या स्थापन कराव्यात, तक्रारदारांना संरक्षण देऊन त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करावी, पॉक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक अत्याचार विरोधी अन्य दखलपात्र कलमांचा वापर करून आरोपींवर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागण्याही अभिव्यक्ती यावेळी करत आहे.