पुणे-राजकीय कार्यासाठी विविध मंडळाचे सहाय्य घ्यावे लागते ,२ वर्षे कोरोनामुळे मंडळांना उत्सव साजरा करण्यात आला नाही या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश उत्सव ,दहीहंडी धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी विविध राजकीय स्तरावरून आणि सरकारी स्तरावरूनही मंडळांना प्रेरणा मिळत असताना दुसरीकडे मात्र वर्गणी साठी महागाई, बेरोजगारी,कोरोना काळात नैराश्य आलेल्या जनतेचा विचार न करता काही मंडळे सामुहिक रित्या धाकदपटशा दाखवून वर्गण्या गोळा करत असल्याचे दिसून येऊ नये म्हणून मात्र प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळेच एका व्यावसायिकाला बेदम मारहाणीला सामोरे जावे लागले आहे. दहीहंडीसाठी पाचशे रुपयांची वर्गणी मागत असताना अवघे शंभर रुपयेच वर्गणी दिल्याचा राग आल्याने दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने स्नॅक्स अण्ड स्विट सेन्टर दुकान चालकाला मारहाण केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.
दुकानाच्या गल्ल्यातील 10 ते 12 हजार रुपये जबरदस्तीने काढून, पुढच्या महिन्यापासून हप्ता चालू कर नाहीतर तुझ्या आई – वडीलांना मारून टाकू, अशी धमकी देत टोळक्याने दहशत पसरवल्याचा प्रकार बुधवारी (9 ऑगस्ट) रात्री 8.00 सुमारास रहाटणी येथे घडला. दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
राहूल अरविंद गुप्ता (वय 27, रा. जयभवानी चौक, रहाटणी लिंक रोड, रहाटणी,पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रसाद राऊत (वय 25), मनेश उर्फ मन्या कदम (वय १८), माऊली उपल्ले (वय 21), यश रसाळ (वय 20), रोहित शिंदे उर्फ बॉण्ड, सुनिल शेट्टी, विजय तलवारे आणि त्यांच्या तीन ते चार साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी प्रसाद राऊत, मनेश उर्फ मन्या कदम, माऊली उपल्ले, यश रसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रहाटणी येथील राज स्नॅक्स अण्ड स्विट सेंटर या दुकानात येऊन दहीहंडीची वर्गणी मागू लागले. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांचा भाऊ विवेक याच्याकडे वर्गणीचे पुस्तक दिले. त्यानंतर विवेक याने आरोपींना शंभर रुपये वर्गणी दिली. मात्र, ही रक्कम घेण्यास नकार देऊन आरोपी शेट्टी याने पाचशे रुपयांची मागणी करत विवेक यांच्या कानाखाली मारली. विवेक यांनी दोनशे रुपये वर्गणी देऊ केली. याचा राग आल्याने आरोपी शेट्टी आणि तलवारे यांनी विवेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी इतर आरोपी दुकानात घूसून फिर्यादी व त्यांच्या भावांना मारहाण करू लागले. आरोपींनी दुकानातील स्नॅक्स काऊंटर खाली पाडले, दुकानातील काचा फोडल्या. तुम्हाला माहित नाही का आम्ही या ऐरियाचे भाई आहोत, असे म्हणत लोखंडी कढई फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या आई – वडीलांनाही आरोपींनी मारहाण केली. तसेच आरोपी शेट्टी आणि तलवारे यांनी गल्ल्यातील 10 ते 12 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पुढील महिन्यापासून हप्ता चालू करायचा नाहीतर तुझ्या आई वडीलांना मारून टाकू, अशी धमकी देत दुकानासमोर दहशत माजून आरोपी निघून गेले.याबाबत सहायक पोलिस निरिक्षक अभय दाभाडे पुढील तपास करत आहेत.