पुणे- पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी रेल्वे बोर्डाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. 2 ते 6 ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावरील सर्वच फलाटांवर 26 कोचच्या गाड्या थांबू शकतील. मार्च 2019 पर्यंत पूर्ण हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 2 ते 6 ची लांबी कमी असल्याने तेथे 26 डब्यांची गाडी थांबविली जात नाही. केवळ एक क्रमांकाच्या फलाटावरच 26 डब्यांच्या गाड्या थांबतात, असे नमूद करून देऊस्कर म्हणाले, ‘‘रेल्वे स्थानकाची लांबी कमी असल्याने या फलाटांवर मालगाडी थांबविता येत नाही. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना थांबवून मालगाडीला प्रथम सोडावे लागते. परिणामी, इतर गाड्यांना 10 मिनिटे उशीर होतो. परंतु, लवकरच 2 ते 6 फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.
देऊस्कर म्हणाले, ‘‘सर्व फलाटांवर 26 डब्यांच्या गाड्या उभ्या करता याव्यात, या दृष्टीने शिवाजीनगरच्या दिशेला या फलाटांची लांबी वाढविली जाणार आहे. पुणे-लोणावळा मार्गावर आॅटोमॅटिक सिग्नल ब्लॉकिंगचे काम सुरू असून, अात्तापर्यंत पुणे ते कामशेतदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे.