पुणे : चेन्नई येथील करुणा इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘करुणा राष्ट्रीय पुरस्कार’ पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शाकाहाराचे पुरस्कर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना अहिंसा, प्राणिदया आणि शाकाहार प्रसारात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
चेन्नईतील एसआरकेके अगरवाल सभा भवन येथे नुकत्याच झालेल्या २२ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. करुणा इंटरनॅशनलचे अध्यक्ष कैलाशमल दगड, सरचिटणीस पदमकुमार टाटिया, सहसचिव सुरेश कांकरिया, डॉ. एमजीआर एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिटयूट विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. ए. सी. शण्मुगम, श्री चंद्रप्रभू जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शांतीलाल जैन, म्यलापोर जैन संघाचे अध्यक्ष मोहनलाल चोरडिया, मेडि सेल्स ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र श्रीश्रीमल आदी उपस्थित होते.
परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “करुणा इंटरनॅशनलच्या वतीने देशभरात २१०० करुणा क्लब चालवले जात असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांवर दया, प्रेम, करुणा, अहिंसा आणि शाकाहाराचे संस्कार केले जात आहेत, ही चांगली बाब आहे. अहिंसा, जीवदया, करुणा आणि शाकाहार हीच आपल्या जीवनाची मुख्य तत्त्वे असायला हवीत. माझ्याकडून प्रेरणा घेऊन माझे अनेक सहकारी अहिंसेच्या क्षेत्रात काम करत आहेत. माणसाच्या मनामनात करुणा भाव जोपासायला हवा. त्यासाठी आपण प्रत्येकाने त्याचे आचरण करणे गरजेचे आहे.”