पुणे, दि. ०९ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाने ‘सवाल अंधाराचा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचा मंगळवारी (दि. ८) समारोप झाला. यावेळी थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य अभियंते श्री. सचिन तालेवार (पुणे), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री. परेश भागवत (कोल्हापूर) यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की नाट्यस्पर्धांच्या आयोजनातून महावितरण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. रंगकर्मी प्रगल्भ होत आहेत. व्यावसायिक नाटकांच्या तोडीच्या नाट्यकृती सादर केल्या जात आहेत. ही स्पर्धा असली तरी नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेचा आनंद रंगकर्मींसाठी वेगळाच असतो. रंगभूमी ही जिवंत कलेचे व्यासपीठ आहे. तिथे चित्रपटासारखे रिटेक नाही. त्यामुळे अतिशय धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना राज्यभरातील नाट्यमहोत्सव हा नवऊर्जा देणारा आहे.
नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुणे परिमंडलाने मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार निर्मित व अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार दिग्दर्शित ‘सवाल अंधाराचा’ ही नाट्यकृती सादर केली. प्र.ल. मयेकर लिखित या नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या नाटकासह कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ व बारामती परिमंडलाचे ‘ब्लाईंड गेम’ या नाटकांच्या सादरीकरणाचे परीक्षण नाट्यपरीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन व सौ. मंजुषा जोशी यांनी केले. यामध्ये पुणे परिमंडलांचे ‘सवाल अंधाराचा’ नाटकाने प्रथम तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
यासोबतच वैयक्तिक गटात दिग्दर्शन– प्रथम – मंगेश कांबळे (कोल्हापूर) / द्वितीय – राजेंद्र पवार (पुणे), अभिनय (पुरुष)– प्रथम- प्रसाद दिवाण (कोल्हापूर)/ द्वितीय – संतोष गहेरवार (पुणे), अभिनय (स्त्री)– प्रथम- सोनाली बावस्कर (पुणे)/ द्वितीय- गंगाक्का गुडुर (बारामती), नेपथ्य– प्रथम- संजय कांबळे (कोल्हापूर) / द्वितीय- राजीव पुणेकर व भरत अभंग (पुणे), प्रकाशयोजना– प्रथम- गणेश लटपटे (बारामती)/ द्वितीय- श्रीकांत सनगर व शशांक आष्टेकर (कोल्हापूर), पार्श्वसंगीत– प्रथम- संजय नायकवडी व अभिजित टेंभुर्णे (पुणे) / द्वितीय- विनायक पाटील व सुरेश पाटील (कोल्हापूर), रंगभूषा व वेशभूषा– प्रथम- संतोष आडूळकर व सुमन पाटील (कोल्हापूर) / द्वितीय- माधुरी मेश्राम व निकिता खैरनार (पुणे). अभिनय उत्तेजनार्थ– अपर्णा मानकीकर (पुणे), रामचंद्र चव्हाण (बारामती) व संभाजी कांबळे (कोल्हापूर). बालकलाकार उत्तेजनार्थ – कनिष्का खोबरे (कोल्हापूर) व श्रद्धा चव्हाण (बारामती.)
बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले तर डॉ. संतोष पटनी व भक्ती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी आभार मानले. पुणे परिमंडलाकडून आयोजित या नाट्यस्पर्धेला पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व तिनही नाटकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती.