महापालिका विपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा भाजपा अध्यक्षांना टोला
पुणे -शहरातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने किती निधी दिला हे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावे असा टोला महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी लगावला आहे. भाजपचे खासदार, आमदार यांनी निधी मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले याचा खुलासाही शहराध्यक्षांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपचे नगरसेवक मनपामध्ये कोट्यवधी रुपयांचे बोगस टेंडर करतात. टेंडरमध्ये भ्रष्टाचार करतात, रिंग करतात, त्याबद्दल शहराध्यक्ष काही बोलणार का? अशी विचारणाही त्यांनी केली. जलपर्णी, कचरा वाहतूक घोटाळा आंबील ओढा सीमा भिंत टेंडर अशी अनेक उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे शहरासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ज्या सुविधा, उपाययोजना व नियोजन करून पुणे शहर कसे कोरोनामुक्त होईल यासाठी गांभीर्याने लक्ष देत आहेत, तरी सुध्दा भाजप यामध्ये राजकारण करीत असल्याचा आरोपही दीपाली धुमाळ यांनी केला आहे.
पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम ससून रुग्णालयात राज्य सरकारच्यावतीने 24 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत लॅब उपलब्ध करून दिली.
त्याचबरोबर राज्यशासनाने ससून रुग्णालयातील स्वतंत्र इमारत कोरोनासाठी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा आणि उपाययोजनासाठी सहा आयएएस अधिकारी नेमून प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या 4 हप्त्यांचे एकूण 608 कोटी रुपये जीएसटीची रक्कम पुणे महापालिकेला दिली.
पूर्वी भाजप सरकार दर महिना 140 कोटी रुपये जीएसटीसाठी द्यायचे. मात्र, अजित पवार यांनी जीएसटीची रक्कम 152 कोटी रुपये केली. म्हणजे महिना 12 कोटी रुपये वाढ केली. दर आठवड्याला अजित पवार पुण्यात कोरोना संदर्भातआढावा बैठक घेत आहेत. वेळोवेळी सूचना देत आहेत.
भाजपचे अध्यक्ष म्हणतात पुणे मनपामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यांनी आजपर्यंत 200 कोटी रुपये खर्च केलेले आहे. मला भाजपचे अध्यक्ष यांना सांगायचे आहे की, हे 200 कोटी रुपये फक्त भाजपच्या नगरसेवकांचे नाही तर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या फंडातील ही रक्कम उपलब्ध करून प्रशासनाला खर्च करण्यास दिलेली आहे.
राज्य शासनाकडून पुणे शहरासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करीत आहोत. तो लवकरच निधी मिळेल. अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र 1 हजार बेड्सचे अद्ययावत कोरोना रुग्णाललयाची निर्मिती करण्यात होणार आहे.
ज्याप्रमाणे राज्य शासनाकडून अधिक मदतीची अपेक्षा करता मग केंद्र सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे, पुणेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी मागणीही दीपाली धुमाळ यांनी केली आहे.