पुणे-“गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे ‘छा-छू’ काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय? चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा,असा प्रश्न विचारत अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना स्पष्ट सूचना केली.
पुण्यातील पोलीस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा घेताना कामाच्या दर्जावरुन अजित पवार चांगलेच भडकले. अधिकारी आणि कंत्राटदाराला त्यांनी धारेवर धरलं.आज सकाळी सकाळी हा प्रसंग उदभवला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन कामाची पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, श्रीमती स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
पुणे पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या हस्ते विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. तसंच कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यानंतर पोलीस मुख्यालयातील कामांचा आढावा घेताना अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.