पुणे, दि. २५ मे २०२२: जानेवारीपासून वीजबिलाची थकबाकी असल्याने नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणच्या कोंढवा शाखा कार्यालयात तोडफोड व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभागाच्या कोंढवा शाखा कार्यालय अंतर्गत कोंढवा बुद्रुक येथील वीजग्राहक दिनकर साळवे यांच्याकडे वीजबिलापोटी २७ जानेवारी २२ पासून ६ हजार ३९६ रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांच्याकडील वीजपुरवठा महावितरणकडून मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता खंडित करण्यात आला. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास कोंढवा शाखा कार्यालयात वीजपुरवठा खंडित करता काय म्हणून एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना शिविगाळ सुरु केली. स्वतःचे नाव जितेंद्र दिनकर साळवी असे सांगत त्याने कार्यालयात तोडफोड केली. टेबलवरील रजिस्टर फेकून दिले. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. निवास आळवेकर यांना ढकलून दिले. याप्रकरणी जितेंद्र दिनकर साळवी विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.