पुणे :- आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उर्जेच्या वापरानेच विजेची बचत करणे शक्य आहे त्यामुळे अपारंपरिक उर्जेच्या वापरास स्वत: पासून सुरुवात करण्याचे आवाहन डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे औचित्यसाधून द इन्स्टिटुयट ऑफ इंजिनिअर्स पुणे विभाग आणि डीएसके समूहातर्फे देण्यात येणाऱ्या ‘डीएसके उर्जा पुरस्कार २०१६‘चे वितरण शुक्रवारी साईज कंट्रोलचे अध्यक्ष अशोक दुर्वे यांच्या हस्ते झाले. उर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थाना डीएसके समूहातर्फे गेल्या अठरा वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो.
पर्यावरणाविषयीची जागरूकता लक्षात घेऊन त्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या सागर मित्र संस्थेचे विनोद बोधनकर यांना साईज कंट्रोलचे अध्यक्ष अशोक दुर्वे यांच्या हस्ते तर उर्जा संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर काम करणाऱ्या डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांना डीएसके समूहाचे विनयकुमार बडगंडी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एम. बाबर, महादेव म्हस्के, डी. जे डोके, के.के. घोष व्यासपीठावर उपस्थित होते.
प्लॅस्टीकमुक्त नद्या व समुद्र करण्यासाठी सागर मित्र अभियानाची सुरूवात करण्यात आली असून शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही खूप लक्षणीय असल्याचे विनोद बोधनकर यांनी सांगितले.
वर्षातला एकच दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा ३६५ दिवस प्रत्येकाने नियमांचे पालन करून स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत अशोक दुर्वे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डी. बी. धोणे यांनी केले तर व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.