पुणे : राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी असमान निधीसाठी दिनांक 20 डिसेंबर 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. असमान निधी योजनेसाठीचे विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.
योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयानी आपले प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे येथे दि. 20 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावेतत,असेही श्री. राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.