पुणे: शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयाचा ९५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. करोना काळातील रुग्णसेवेत महत्त्वाचे योगदान रुग्णालयाने दिले असून येत्या काळात १० खाटांचा अतिदक्षता विभाग तसेच १६ खाटांचा बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे ९५ व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर करण्यात आले. लवकरच ताराचंद रुग्णालयाला रुग्णालयांसाठीचे राष्ट्रीय मानांकन प्रमाणपत्रही प्राप्त होणार आहे. रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त गोपाळ राठी यांनी याबाबत माहिती दिली.
रॅनडॅक फास्टनर्स इंडिया प्रा. लि. चे संचालक सतीश भिडे यांनी ताराचंद रुग्णालयाने ९५ वर्षांपासून केलेल्या अविरत रुग्णसेवेबाबत कृतज्ञता व्यक्त के ली. तसेच, रुग्णालयात सेवा देणाऱ्या मानद डॉक्टरांचे अभिनंदन केले. ताराचंद रुग्णालयाला भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले तसेच शेठ ताराचंद रुग्णालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, कार्यकारी विश्वस्त गोपाळ राठी, रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सदानंद देशपांडे, उपअधीक्षक डॉ. कल्याणी भट, विश्वस्त डॉ. र.ना. गांगल, डॉ. गिरीश टिल्लू, डॉ. राजेंद्र हुपरीकर, डॉ.कल्याणी भट, रतन राठी उपस्थित होते.
सतीश भिडे म्हणाले की, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या समाजाच्या दोन मुख्य गरजा आहेत. चांगले शिक्षण देणा-या संस्था असण्याबरोबरच चांगले शिक्षक सुद्धा असणे गरजेचे आहे. शिक्षकांचे मुल्यमापन हे त्याच्या पगार अथवा शिक्षण संस्थेवर असण्यापेक्षा त्याने घडविलेल्या विद्यार्थ्यांवर अवलंबून असले पाहिजे.
महेश आठवले म्हणाले की, आयुर्वेदाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, ऋषिमुनींनी केवळ भारतीयांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला दिलेली देणगी आहे. आयुर्वेदाचा शास्त्रीय ज्ञानाचा पाया भरभक्कम असल्यामुळे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या रुग्णांमध्येसुद्धा आयुर्वेदीय उपचारांचे खूप चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे लोकांचा आयुर्वेदाकडे वाढता ओढा आहे. मात्र सगळे उपचार थकल्यानंतर आयुर्वेदाकडे येण्याची मानसिकता बदलली पाहिजे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.