पुणे दि. 21 जून, 2022
देशातील नागरिकांना योगचे महत्व व त्याचे लाभ सांगणे, या उद्देशाने योग दिन महत्वाचा आहे. आत्मनिर्भर होत असताना प्रत्येक नागरिक निरोगी व्हावा, हे गरजेचे आहे , अशी भावना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पुणे इथे व्यक्त केली.
आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन झाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर भारत सरकार तर्फे या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
मेट्रो स्थानकावर योग दिन साजरा होणे व फलाटावर योग सराव करणे, हे विशेष आहे; त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या स्थानकावर योग करताना नागरिकांना पाहणे, याचा आनंद आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. हे योग चित्र प्रदर्शन फुगेवाडी मेट्रो स्थानकात तीन दिवस विनामूल्य पाहण्यास उपलब्ध आहे.
केंद्रीय संचार ब्यूरोच्या विभागीय कलाकारांनी यावेळी योग आधारित गीते सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थित नागरिकांनी मेट्रो स्थानाकाच्या तीन मजल्यांवर आयोजित योग सत्रात सहभाग घेतला . प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवर योगासने करणे अविस्मरणीय अनुभव देणारे होते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
योगोत्सवात सहभागी झालेल्या पहिल्या एक हजार नागरिकांना याप्रसंगी फुगेवाडी ते पिंपरी आणि परत असा मोफत प्रवास (जॉय राईड) देण्यात आला.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आपल्या आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत आज पुण्यातील आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिन-2022 आज आगाखान पॅलेसच्या आवारात साजरा केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने इंडिया टुरिझम, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानतळ प्राधिकरण, योगाभ्यास स्कूल आणि केंद्रीय विद्यालय संघटना यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या प्रादेशिक संचालक (पश्चिम विभाग) डॉ. नंदिनी भट्टाचार्य-साहू, इंडिया टुरिझमच्या अपर्णा आठल्ये, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क इंडियाचे संचालक डॉ. संजय कुमार गुप्ता ,केंद्रीय विद्यालय संघटन, मुंबईचे सहाय्यक आयुक्त एस व्ही जोगळेकर आणि योगा अभ्यास स्कूलच्या प्रमुख प्रशिक्षक निवेदिता आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी एएसआय मुंबई विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र यादव यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत केले.
यावेळी योग अभ्यास स्कूलच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगा दिनाचे प्रात्यक्षिक आणि आसने करण्यात आली. योग कार्यक्रमात पुणे येथील केंद्रीय विद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांसह ३५० हून अधिक जण सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योगा दिन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागातील विविध वारसास्थळी अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरात केंद्रीय विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सहकार्याने योगासने सादर केली. तर पुण्यात शनिवारवाडा येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांनी संयुक्तपणे योगा प्रात्यक्षिकांचे कर्मचार्यांसाठी आयोजन केले. त्याचप्रमाणे, अलिबाग येथील सातखणी बुरूज, जुन्नर येथील लेण्याद्री लेणी, पालघर जिल्ह्यातील वसईचा किल्ला, जुन्नर येथील शिवनेरी किल्ला, रत्नागिरी येथील विजयदुर्ग, मुंबईतील सायन किल्ला, कान्हेरी लेणी, रायगड किल्ला, पुण्यातील पाताळेश्वर लेणी, सोलापूर किल्ला या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या इतर वारसास्थळी जनतेसाठी योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.