- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती; जाणून घ्या आणखी काय सांगितलं आहे.
पुणे – राज्यातील करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडतच आहे. शिवाय, काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत. या पार्श्वभूमीव आज पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, ,सभागृहनेते गणेश बिडकर ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेत, शहरातील नव्या निर्बंधांबाबत माहिती दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा(जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सुरू राहणार आहे.
पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
पुणे महापालिकेचे नवीन आदेश पुढीलप्रमाणे:
* पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी.
* बँकांचे कामकाज सूरु राहणार.
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार.
* रेस्टॉरंट आणि बार हे फक्त पार्सल आणि घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
* ई- कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच इतर वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा
* शहरात दुपारी ३ नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण ,सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी.
*महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त) २५ टक्के अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
* कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्याच्याशी निगडित देखभाल व दुरुस्ती सेवा ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार.
* मद्याविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार
हे राहणार बंद
सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल
* चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग बंद
* उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने बंद रहाणार
* सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
*पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
* सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने
* मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार बंद राहणार
* लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ यावरील निर्बंध कायम