पुणे – महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाई ला आल्याचे दाखवून पालिकेच्या मालमत्ता विक्रीला काढण्या ऐवजी पुणे शहरात टुरिझम टॅक्स च्या धर्तीवर बाहेरून येऊन फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर कर आकारणी करून उत्पन्न वाढीचा विचार करावा अशा पद्धतीच्या कॉंग्रेसच्या गटनेते आबा बागुल यांच्या प्रस्तावाला प्रशासनाने लाल दिवा दाखवून नकारघंटानाद केला आहे. विशेष म्हणजे नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने असा कर लाऊ नये असा कळवळा यामागे कारण म्हणून नमूद करण्यात आला आहे. यावर बागुल यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रस्तावाचा विचार करावा या साठी फेरविचार प्रस्ताव दिला आहे.
या प्रस्तावात बागुल यांनी म्हटले आहे की,’महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मनपाच्या मालकीच्या सदनिका विक्री करणे, अॅमिनिटी स्पेसेस विक्री करणेबाबत आपण निर्णय घेत आहोत. पुणे महाापालिकेचे उत्पन्न कायमस्वरूपी वाढविणेसाठी आम्ही वेळोवेळी शाश्वत पर्याय सुचवित असतो. यामध्ये .स्थायी समितीपुढे टुरिझम टॅक्स व मिळकत करामध्ये वार्षिक करपात्र रक्कमेवर ५ टक्के आरोग्य सेवा कराची आकारणी करणेबाबत लावणेबाबत ठराव होता. पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे म्हणजे मनपाची संपत्ती विक्री करणे नाही तर शहरात देण्यात येणा-या सुविधांवर योग्य कर घेणे, ही आयुक्तांची जबाबदारी आहे.
पुणे शहरात अन्य शहरातून, राज्यातून, देशातून नागरिक येत असतात. हे नागरिक शहरात आल्यानंतर शहरातील पाणी, उदयान, ड्रेनेज, रस्ते, विदयुत अशा सेवांचा उपभोग घेतात, शहरात प्रदूषण करतात. या सुविधा महानगरपालिकेकडून पुरविण्यात येतात. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १२७ (२) मध्ये उपभोग, उपयोग याबाबत कर आकारणी करणेची स्पष्ट तरतूद केलेली आहे. देशातील अन्य महापालिकांमध्ये व परदेशामध्ये अशा प्रकारे शहरात येणा-या टुरिस्टवर कर आकारणी केलेली आहे. पुणे शहरात अन्य देशातून, राज्यातून विविध कामानिमित्त येणारे नागरिक 5 स्टार, थ्री स्टार, टू स्टार अशा हॉटेलमध्ये वास्तव्य करतात, त्यांना रू.५०० /- र.रू.३००/- र.रू.२००/- अशा पध्दतीने टुरिझम कर आकारणी केल्यास मनपाच्या उत्पन्नामध्ये अंदाजे १०० कोटी इतकी कायमस्वरूपी वाढ होईल. टुरिझम टॅक्स या शब्दामुळे कर आकारता येत नसेल तर योग्य शब्द आपण ठरवून कर आकारणी करावी. आम्ही स्थायी समितीपुढे ठराव देण्याचा उददेश मनपाने दिलेल्या सुविधांवर कर आकारणी करून मनपाचे उत्पन्न वाढविणे, परंतू खेदाने नमूद करावेसे वाटते की, प्रशासनाने सदर विषय सकारात्मक घेणे गरजेचे असताना अभिप्रायामध्ये नागरिकांचे विविध कारणाने उत्पन्न कमी झाले आहे, रोजगार नाही अशा बाबी दिलेल्या आहेत.
तसेच पुणे शहरातील नागरिकांना आरोग्याची सुविधा देणे स्थानिक स्वराज्य संस्थेस कायदयाने बंधन असून याकामी पुणे मनपाने रूग्णालये उभारली आहेत. कोरोनाने पुण्यामध्ये शिरकाव केल्यावर पुणेकरांवर आरोग्य विषयक खर्च करणेसाठी मनपाने कोटयावधी रूपये खर्च केले आहेत. आरोग्य विषयक सुविधा देणे हे काम कायमस्वरूपी चालू राहणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑगनायझेशनने सांगितल्यानुसार भविष्यात अनेक गंभीर आजार येतील असा अंदाज आहे. अशा वेळी देखील मनपास आरोग्य विषयक कोटयावधी रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. मनपाचे एकमेव मुख्य उत्पन्न स्त्रोत मिळकत कर आहे. सदयस्थितीत होणारा खर्च व उत्पन्न यांचा अंदाज पाहता महानगरपालिकेस शाश्वत उत्पन्नाचे मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे. आम्ही दिलेल्या ठरावाच्या अभिप्रायामध्ये राज्य शासनास कराबाबत अधिकार आहे असे आपण नमूद केलेले आहे.तरी सदर विषयी आम्ही पुन्हा.स्थायी समितीपुढे उपरोक्त नमूद दोन्ही ठरावांचे फेरविचार दिलेले आहेत. सदर विषयी फेरअभिप्राय सकारात्मक पध्दतीने ठेवून महापालिकेच्या अधिकारात टुरिझम टॅक्सबाबत कर आकारणीचा विषय शब्दामध्ये न अडकवता निर्णय घ्यावा. तसेच आरोग्य सेवा कराबाबत राज्य शासनाकडे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणेसाठी सकारात्मक विषयपत्र पाठविण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.