कोविड हॉस्पिटलला मिळेना स्टाफ …..
पुणे- महानगरपालिकेच्या हद्दीतील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टर,नर्सेस व स्टाफला पीएमआरडीकडून नेमलेली एजन्सी, जादा पगार व सरकारी सेवेत कायम करतो असे प्रलोभन देऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये कामाला येण्यास प्रवृत्त करीत असून यामुळे खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे असा आरोप कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे .
यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना लिहिलेले पत्र प्रसिद्धीसाठी पाठविले आहे यात असे म्हटले आहे कि ,पुणे शहरात सार्वजनिक रुग्णालयांची संख्या कमी असल्याने गेल्या ५ महिन्यापासून कोरोनाने संक्रमित झालेल्या नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार देऊन कोरोनावर मात करण्यात खासगी रुग्णालयांनी मोलाची भूमिका बजावली आहे.यात तिळमात्र शंका नाही.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीएमआरडीकडून पुणे शहरात मोठे हॉस्पिटल उभारले आहे. हे हॉस्पिटल सांभाळण्याची जबाबदारी लाईफ लाईन या एजेन्सीला देण्यात आली आहे. या एजेन्सीमधील डॉक्टर गोखले हे शहरातील खासगी रुग्णालयातील तात्पुरते व कायम असलेल्या डॉक्टर, नर्सेस व स्टाफ यांना जादा पगार देतो आमच्या हॉस्पिटल मध्ये कामाला या भविष्यात तुम्हाला सरकारी सेवेत कायम करण्यात येईल असे वारंवार फोन करून प्रलोभन देऊन कामावर बोलवत आहेत. असे करणे साफ चुकीचे आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये अडचणीत आली असून वारंवार आमच्याशी संपर्क करत आहे.असेच होत राहिल्यास खासगी रुग्णालयांकडे स्टाफ राहणार नाही. त्यामुळे शहराच्या आरोग्यसेवेवर खूप मोठा ताण येईल व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उपचार करणे देखील अवघड होईल.
हा चाललेला प्रकार अतिशय चुकीचा असून याबाबत आपण विभागीय आयुक्तांशी तातडीने संपर्क करून व बैठक घेऊन लाईफ लाईन एजन्सी करत असलेल्या कृत्यास थांबून याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी.
पुणे शहरात सार्वजनिक व खासगी रुग्णालये मिळून कोरोना थोपवण्यासाठी सक्षमपणे काम करत असून अश्या प्रकारचे कृत्य करून शहराची आरोग्यसेवा खिळखिळीत करू नये. शहरासाठी मोठे हॉस्पिटल उभारून बेडची संख्या वाढेल परंतु लगेच स्टाफची संख्या वाढवणे शक्य नाही. यासाठी लाईफ लाईन एजन्सीने शहराच्या बाहेरचे (जिथे कोरोनाचे रुग्ण संख्या कमी आहे.) डॉक्टर , नर्सेस व स्टाफ आणावा अन्यथा अन्य पर्याय शोधावे परंतु अश्या कठीण काळात शहरातील रुग्णालयांना अडचणीत आणू नये.
पुणे शहरातील स्टाफ न घेता अन्य शहरात कोरोना रुग्ण कमी असल्यास तेथील स्टाफ या हॉस्पिटलला घ्यावा असा धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. यातील सत्यता तपासून असे होत असल्यास हा प्रकार थांबवणायचे त्वरित आदेश द्यावे ही विनंती.