९ व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेचे उद्घाटन.
पुणे,९ फेब्रुवारीः वसुधैव कुुटुंबूकम्, एकम सत विप्रा बहुधा वदन्ति आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे नवीन समाज आणि नवीन जग निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे भारतीय तत्त्व आहेत. त्यामुळे संपूर्ण मानव जातीचे कल्याण होणार आहे. असे विचार पद्माविभूषण डॉ. करण सिंह यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत तर्फे श्री काशी विश्वनाथ कॉरिडॉर, वाराणशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ९व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नवी दिल्लीच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार, स्वामी योगी अमरनाथ, बिहारचे माजी मंत्री प्रमोद कुमार, डॉ. योगेंद्र मिश्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे होते. तसेच, परमपूज्य श्री. श्रीकृष्ण कर्वे गुरूजी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी शिक्षण समुहाच्या सचिव प्रा. स्वाती कराड-चाटे व प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
डॉ. करणसिंग म्हणाले, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग आणि राजयोग या तत्त्वाचे पालन केल्यास संपूर्ण मानव जातीचा उद्धार होईल. विश्वातील सर्वच धर्मांमध्ये कुठे ना कुठे तरी मानवहिताचा विचार आलेला आहे. राजयोग ही अध्यात्मिक शक्तींची गुरूकिल्ली आहे. त्याच्या सहाय्याने मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करीत असताना सर्व भारतीय ऋषीमुनी आणि तत्त्वज्ञांनी एक नवा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे नवे जग निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
इंद्रेश कुमार म्हणाले, जागतिक शांततेचे स्वप्न साकार करायचे असेल तर भारतीय तत्त्वे जाणून घेऊन वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वाचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. प्रत्येक धर्मात काही ना काही तरी चांगले दडलेले आहे. त्या चांगुलपणाचा सर्वांनाच फायदा होऊन वाईट विचारांचा र्हास होईल.
प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि आद्यात्माच्या समन्वयानेच जगात शांतता नांदू शकते. या कॉरिडॉरचे आता नॉलेज कॉरिडॉर मध्ये रूपांतर झाले पाहिजे. धार्मिक ग्रंथ हे जीवन ग्रंथ आहेत. आपल्याला अंतिम सत्याचा शोध सुरू करावा लागेल. आपली भारत माताच आता संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.
योगी अमरनाथ म्हणाले, जिथे ज्ञान आहे तिथे विद्वत्ता आहे. प्राचीन काळापासून शतकानुशतके संशोधन करून मिळविलेले ज्ञान आता जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे. विज्ञान त्याच्या आधारे नवीन शोध लावत आहे. मंथनातून जे ज्ञान बाहेर पडेल त्यातून मानवाचे कल्याणच होणार आहे. म्हणूनच आध्यात्मिक विचारांची कास धरण्याची गरज आहे.
डॉ. योगेंद्र मिश्रा म्हणाले, पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे जागतिक शांततेचे कार्य सुरू आहे. प्रत्येक माणुस सुखाच्या शोधात आहे. मानव जातीच्या कल्याणाकरीता संपूर्ण जग भारताच्या पाठीशी आहे. जीवनात चांगल्या गोष्टींपुढे नतमस्तक होऊन वाईट विचारांना थारा न देता, वेळेचा सदुपयोग करावा.
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.