पुणे – देशाच्या शैक्षणिक स्तर उंचावण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या
सल्लागार समितीच्या सदस्यपदी खासदार अमर साबळे यांची निवड झाली आहे. भारताच्या संसदीय कार्यमंत्रालयाचे
सचिव डॉ. राजेंद्र शुक्ला यांनी या निवडीबाबतचे पत्र नुकतेच जारी केले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मंत्री
रमेश पोखरीयाल निशंक आणि याच मंत्रालयाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. या
समितीच्या सदस्यपदी देशातील २५ खासदारांची निवड करण्यात आली असून त्यात खासदार अमर साबळे यांची
निवड करण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे.
देशाचे शैक्षणिक धोरण ठरवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, महिला, गरीब, अल्पसंख्यांक आणि वंचित
घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी योजना तयार करणे, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजघटकाला
शैक्षणिक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील व परदेशातील
विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे यासह शैक्षणिक
क्षेत्राशी संबंधित निर्णयप्रक्रियेत चर्चेद्वारे योगदान देण्याचं महत्त्वाचं काम या सल्लागार समितीच्या माध्यमातून होत
असते. अशा समितीत निवड झाल्यानं भारतीय शिक्षणपद्धतीचं पुनरुत्थान करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार
आहे. भारताकडे असलेल्या ज्ञानपरंपेची पार्श्वभूमी पाहता भारताकडे विश्वगुरू होण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न
करणार असल्याचं मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले आहे. ही निवड झाल्यानिमित्त खासदार अमर साबळे
यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रीय
कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय खाद्य वितरण विभागाची स्थायी समिती, अनुसूचित जाती-जमाती संसदीय कल्याण समिती, हिंदी सल्लागार
समिती, भाजपा संसदीय कार्यकारी समिती, महाराष्ट्र शासनाची अल्पसंख्यांक समिती, पुणे क्षेत्र रेल्वे समिती, कोकण
रेल्वे समिती अशा विविध समित्यांच्या सदस्यपदी यापूर्वी खासदार अमर साबळे यांची वर्णी लागली आहे. तसेच
अखिल भारतीय केवीआयसी अधिकाऱ्यांची संघटनेचे अध्यक्ष, पुणे बीएसएनएलचे उपाध्यक्ष, भारत-अफ्रिका संसद मैत्री
शिखर संमेलनाचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.