लातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन रेल्वेने पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लातूर शहरासाठी रेल्वेने शनिवारी 25 लाख लिटर पाण्याची 18 वी फेरी केली. त्यानुसार दि. 12 एप्रिल रोजी रेल्वेच्या पहिल्या फेरीत 10 वॅगनमधून सुमारे पाच लाख लिटर पाणी आणण्यात आले. दि. 12 ते दि. 19 एप्रिल या कालावधीत या पद्धतीने नऊ फेऱ्या पूर्ण होऊन सुमारे 45 लाख लिटर पाणी आणण्यात आले.
दि.20 एप्रिलपासून 50 वॅगनद्वारे 25 लाख लिटर पाणी आणले जात असून या 50 वॅगनद्वारे रेल्वेच्या 18 फेऱ्यांमधून आजवर सुमारे 4 कोटी 50 लाख लिटर पाणी आणण्यात आले. 10 वॅगनच्या 9 आणि 50 वॅगनच्या आजवरच्या 18 फेऱ्याद्वारे आजपर्यंत एकूण सुमारे 4 कोटी 95 लाख लिटर पाणी आणण्यात आले.
रेल्वेने आणलेले पाणी रेल्वे स्थानकाजवळील एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत साठवले जाते. विहिरीतील पाणी पाईप लाईनद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जात असून तेथून त्याचे वितरण टँकरद्वारे केले जाते. महापालिकेमार्फत पाणी वितरीत करण्यात येणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. दररोज वितरीत करण्यात आलेल्या आणि दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याची सविस्तर माहिती नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

