पुणे – पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भिमा याठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण 58 जणांना 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. मागील वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी पावले उचलली आहेत.
पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 नुसार विविध संघटनेशी संबंधित असलेल्या 58 जणांना नोटिसा बजावल्या असून सीआरपीसी 177 नुसार 188 जणांना दुसरीकडे हलविले आहे. तसेच सराईत 29 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नेमके कोणाकोणाला नोटिसा जारी केल्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेवा ठप्प ठेवण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील जमीन दोन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.

