पुणे- भारत सरकारच्या केंद्रीय कार्पोरेट कार्य मंत्रालय, दिल्ली (कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री) च्या वतीने तीन वर्षांपूर्वीपासून सुरु करण्यात आलेल्या भारतीय कारपोरेट कार्य संस्थान (इंडियन असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स) द्वारे भारतातील कंपनी सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचे काम सुरु असून या मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या कंपनी सामाजिक उत्तरदायित्व अभ्यासक्रमाची पुणे व महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्याचे व कंपनी सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या व्यावसायिकांची पोकळी भरून काढण्याचे महत्वपूर्ण योगदान कर्वे समाज सेवा देत असल्याचे मत केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट कार्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केले आहे.
मानेसर, गुडगाव येथील भारतीय कारपोरेट कार्य संस्थान (इंडियन असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स) च्या आवारात आयोजित पदवीदान सोहळा व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांच्या गौरवपर आयोजित समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सार्वजनिक उपक्रम विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. मधुकर गुप्ता, फायनान्स स्कूल विभाग प्रमुख डॉ. नवीन सिरोही, राष्ट्रीय पायाभूत कंपनी सामाजिक उत्तरदायित्व चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश कुमार तसेच कर्वे समाज सेवा संस्थेचे सचिव एम. शिवकुमार, संचालक डॉ. दीपक वलोकर, सी. एस. आर प्रमाणित प्रशिक्षक व सी. एस. आर. अभ्यासक्रम प्रमुख महेश ठाकूर हे उपस्थित होते.
कर्वे समाज सेवा संस्था पुणे समाजकार्याचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य व नामांकित संस्था असून या संस्थेद्वारे सुरु करण्यात आलेल्या सी. एस. आर. अभ्यासक्रमाच्या विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले.
पुणे येथील कर्वे समज सेवा संस्थेमध्ये २०१३ सालापासून कंपनी सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी) विषयात एक वर्षाचा पदव्युत्तर अर्धवेळ अभ्यासक्रम नियमितपणे सुरु असून आजपर्यंत ७५ हुन अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे. याच अभ्यासक्रमाच्या धर्तीवर २०१५-१६ पासून भारत सरकारच्या केंद्रीय कार्पोरेट कार्य मंत्रालय (कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री) च्या अधिपत्याखालील भारतीय कारपोरेट कार्य संस्थान (इंडियन असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स) या संस्थेच्या वतीने देखील एक वर्षाच्या ऑनलाईन अर्धवेळ अभ्यासक्रमाची सुरुवात कर्वे समाज संस्थेद्वारे करण्यात आली व गतवर्षी प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा गुडगाव येथे संपन्न झाला असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर व अभ्यासप्रमुख महेश ठाकूर यांनी दिली.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या या यशाबद्दल पुणे व परिसरातील विविध कंपन्या, महाविद्यालये व सी. एस. क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत असून संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, चेअरमन सदानंद देशपांडे, सचिव एम. शिवकुमार, व्हा. चेअरमन विनायक कराळे, खजिनदार दीपक जानोरीकर, संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी अभ्यासक्रमप्रमुख महेश ठाकूर, अभ्यासक्रम समन्वयक तपस्या शेलार, सी. एस. आर. सेल समन्वयक चयन पारधी, चेतन दिवाण, सागर लवटे यांचे या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले आहे.

