पुणे-नवरात्र महोत्सवात पशूबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी-देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. देवीसमोर पशुबळी देणे ही अंधश्रद्धा असून, त्यामुळे अनारोग्य, अस्वच्छता आणि दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवीभक्तानी अशा अनिष्ट रूढींना फाटा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात खंडेनवमीच्या दिवशी ‘अजबली’ देण्याची प्रथा आहे. मात्र, ही प्रथा अत्यंत चुकीची असून, या विरोधात सर्व जीव मंगल प्रतिष्ठान कायदा व प्रबोधन यामार्फत गेली 21 वर्षे लढा देत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीसमोर अजबळी देण्याची प्रथा आहे. या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. ही अतिशय अमानुष पद्धतीने भौतिक-कौटुंबिक मानसिक गरज भागविण्यासाठी केलेल्या नवसपूर्तीच्या नावाखाली हजारो बोकडांचा बळी दिला जातो. परिसरात पडलेल्या मांसामुळे, रक्तामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, अनारोग्य निर्माण होते. स्वच्छ भारत अभियानाला छेद देणारी ही प्रथा आहे. त्याचबरोबर अनेकदा यातून दुर्घटना होऊन निष्पाप लोकांचा बळी जातो. ही अधार्मिक आणि अवैज्ञानिक प्रथा आहे. त्यामुळे सरकारने अशा प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा. तसेच सप्तशृंगी देवस्थानचा आदर्श घेऊन देवस्थानांनी पुढाकार घेत या प्रथेला हद्दपार करावे ”
“पशुक्रुरता निवारण कायदा 1960’नुसार उघड्यावर पशुहत्या कायद्याने गुन्हा आहे. यासंदर्भात 1996 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत पशुबळी संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल आहेत. खंडपीठाने देवाच्या नावावर होणारी पशुहत्या बंद करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत, असे आदेश दिले होते. मात्र, राजकीय स्वार्थापोटी सरकारकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. गुजरात व आंध्रप्रदेश राज्यातही हा कायदा करण्यात आला आहे. पोलिसांकडून अशा घटनाना आळा घालण्याचे राज्य सरकारने आदेश दिले असतानाही सर्रासपणे ही प्रथा चालू आहे. काही ठिकाणी ही प्रथा बंद झाली असून, जनजागृती करण्यात मोठे यश येत आहे ” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.
डॉ. गंगवाल पुढे म्हणाले, “देवाची आणि नवस पूर्ण करण्याची भीती नागरिकांच्या मनात असल्याने कर्ज काढून अशा प्रथा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची पिळवणूक होते. राज्यभरातील विविध गावांतील छोट्या-मोठ्या देवस्थांनामध्ये दिले जाणारे हे बळी रोखण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन व पर्यावरण संवर्धनासाठी कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे ”
आईभक्तांनी अंधश्रद्धेला थारा देऊ नये
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या भक्तांनी खंडेनवमीला अजबळी देऊ नये. ही अंधश्रद्धा आहे. देवीला पुरण, नारळ, गोड नैवेद्य दाखवायला हवा. पशुधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पक्षी-प्राण्यांवर प्रेम करण्याऐवजी त्यांचा बळी घेण्यात अजिबात पुण्य नाही. पशुबळींसाठी जमवलेले पैसे स्वतःच्या मुलांच्या शिक्षण आणि प्रगतीसाठी खर्च करा. त्यामुळे भक्तांनी येत्या खंडेनवमीला पशुबळी देऊ नये, असे आवाहनही डॉ. गंगवाल यांनी केले. यासंदर्भातील जनजागृती करणारी पत्रके तुळजापूर आणि परिसरात वाटली जाणार आहेत.