पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि फ्रेशर्सजॉबफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने बावधन येथील सूर्यदत्ताच्या कॅम्पसमध्ये आयोजित ‘मेगा जॉबफेअर’मधून जवळपास २७७ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली असून, त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील, तसेच राज्याच्या विविध भागातून एक हजाराहून अधिक तरुणांनी या नोकरी मेळाव्यात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४३ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच बारा विद्यार्थ्यांना यावेळी नोकरीसाठी पत्र देण्यात आले.
या नोकरी मेळाव्यात इन्फोसिस, टेक महिंद्रा, युरेका फोर्ब्स लिमिटेड, एचडीएफसी सेल्स प्रा. लि., टीएसएल कन्सल्टिंग, आयसीआयसीआय बँक (इप्रोसेस), अॅक्सिस सिक्युरिटीज, रॉयल एनफील्ड, टाटा स्ट्राइव्ह, एलआयसी ऑफ इंडिया, फिनो बँक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, यूटीएस, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयकेवायए ग्लोबल, रँडस्टॅड, ग्रॅव्हिटी आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एचआर, फायनान्स, सेल्स, आयटी, डेव्हलपर, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, बीपीओ, केपीओ आदी क्षेत्रातील पदांसाठी मुलाखती झाल्या. अंतिम निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रता आणि अनुभवानुसार दरमहा १२ ते ४० हजार पर्यंत पगार असणार आहे.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया आणि सहभागी कंपन्यांचे एचआर प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कंपन्यांना चांगले मनुष्यबळ, तर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या हव्या आहेत. या दोहोंमध्ये समन्वय घडवण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजिला. कमी कालावधीत नियोजन करूनही विद्यार्थ्यांचा आणि कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ४३ कंपन्या आणि एक हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. त्यांच्यात संवाद झाला. त्यातून अनेकांना नोकऱ्या मिळतील, याचे समाधान आहे.”
याआधी कॅम्पसमध्ये मुलाखती झाल्या होत्या. मात्र, मनासारखी नोकरी मिळाली नव्हती. इथे माझ्याशी संबंधित ८-१० कंपन्या आहेत. त्यांच्याकडे अर्ज दिले असून, मला मुलाखतीसाठी बोलावले आहे. जॉबफेअरमुळे मला चांगली संधी मिळेल, अशी आशा आहे, असे एका विद्यार्थ्यांनी सांगितले. एकाच छताखाली ४३ कंपन्यांना ‘सूर्यदत्ता’ने एकत्रित आणले. विविध प्रकारची गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या नोकरी मेळाव्याचे नियोजन अतिशय काटेकोर आणि चांगले केले असल्याची प्रतिक्रिया टेकमहिंद्राच्या ‘एचआर’ने व्यक्त केली.

