पुणे : ”कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. उराशी बाळगलेली ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या गोष्टी महत्वपूर्ण असतात. जीवनात नशीब हा भाग अविभाज्य असला, तरी त्याला या तीन गोष्टींची जोड आवश्यक असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी चांगली मूल्ये अंगीकरावीत व एक सुजाण नागरिक बनावे,” असा सल्ला ‘एआयटी’चे पॅट्रॉन इन चीफ व सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती (एव्हीएसएम, एसएम, व्हीएसम) यांनी दिला.
दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) २६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहांती बोलत होते. संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंत गायकवाड यांना ‘यशस्वी उद्योजक’ आणि ‘उडचलो’चे सहसंस्थापक व ‘एआयटी’चे माजी विद्यार्थी रवी कुमार यांना ‘यशस्वी युवा उद्योजक’ म्हणून मोहंती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रवी कुमार यांच्या वतीने त्यांच्या पत्नी डॉ. स्नेहा सिंग यांनी स्वीकारला. प्रसंगी सदर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल डी. एस. अहुजा (एव्हीएसएम), मेजर जनरल प्रीतम बिष्णोई, संस्थेचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट आदी उपस्थित होते. प्रसंगी संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी इन्फर्मेशन सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक क्लबचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सी. पी. मोहंती म्हणाले, ”आपल्या आयुष्यात नशीब महत्वाचे असतेच; पण नशीबाला प्रयत्नांची साथ लाभली, तर आपली स्वप्ने साकार करता येतात. समाजहितासाठी योगदान देणारे अभियंते तुम्ही बनावे. आज हणमंत गायकवाड, रवी कुमार यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करतानाच त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. बंधुभाव जोपासत माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उपक्रमात सहभागी होऊन सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.”
हणमंत गायकवाड म्हणाले, “छोट्या गावातुन येत, पैशाची चणचण असताना कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १९ वर्षी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना करत उद्योगाला सुरवात केली. शेतकऱ्यांसाठी काम सुरु आहे. १००० उद्योजक निर्माण करायचे आहेत. तरुणांनी कल्पना घेऊन याव्यात, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘बीव्हीजी’ पुढाकार घेईल. नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग सुरु करून रोजगारनिर्मिती करावी. आत्मविश्वासाने काम करत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा.” कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, वादन आदी कलांचे सादरीकरण केले. वरद भटनागर या विद्यार्थ्यास ‘ऑलराउंडर बेस्ट स्टुडंट’चा, तर ऐश्वर्या वर्मा हिला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट अकॅडमिक’चा फिरता करंडक मिळाला. ब्रिगेडियर अभय भट यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर मेजर जनरल प्रितम बिश्नोई यांनी आभार मानले.


