ध्यास प्रतिष्ठान’तर्फे समाजभूषण पुरस्कार
पुणे : “प्राण्यांमुळे होणाऱ्या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनच्या हुआन येथील मटण मार्केटमधून आलेला करोना, डुकरांमुळे आलेला स्वाईन फ्लू, कोंबड्यांमुळे झालेला गंबोरो अशा आजारांची उदाहरणे आहेत. या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण शाकाहाराला जवळ केले पाहिजे. वैद्यकशास्त्रानेही शाकाहाराला प्राधान्य दिले आहे,” असे मत सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.
ध्यास प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. गंगवाल यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकारनगर येथील साहित्यसम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, उद्योजक निर्मल देशपांडे यांनाही गौरविण्यात आले. यावेळी प्रवचनकार व लेखिका अपर्णा रामतीर्थकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते.
अपर्णा रामतीर्थकर यांच्या “कुटुंबातील नाती आणि संवाद” या विषयावरील व्याख्यानाने श्रोते भारावून गेले. सोमनाथ पाटील यांनी ध्यास प्रतिष्ठानच्या चालू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती सांगून लोकांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन केतकी कुलकर्णी यांनी केले. आभार अनिरुद्ध जोशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चैताली ढमाले, संगीता नाटेकर, नेहा नगरकर, मृन्मयी कामत, हर्षद ठकार, मुकेश देवळे, शुभेन्दू मोडक, समीर रुपदे, गायत्री गोखले, राहुल डेळेकर, भुषण राणीम, प्रथमेश कुलकर्णी, प्रमोद पवार इत्यादींनी सहकार्य केले.

