‘आयसीएआय’तर्फे १४, १५ डिसेंबरला विद्यार्थ्यांसाठी आतंरराष्ट्रीय परिषद
पुणे : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज विभागाच्या वतीने सीएच्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. दि. १४ आणि १५ डिसेंबर २०१९ रोजी म्हात्रे पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे ही परिषद होणार असून, ‘पाथ फॉर सक्सेस-लर्न, अडॉप्ट अँड ऍक्सलरेट’ ही या परिषदेची संकल्पना आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या आणि आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्ष सीए केमिशा सोनी यांनी दिली. यावेळी ‘आयसीएआय’च्या बोर्ड ऑफ स्टडीजचे उपाध्यक्ष, परिषदेचे उपाध्यक्ष सीए दुर्गेश काब्रा, वंदना नागपाल, आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य, परिषदेचे संचालक सीए चंद्रशेखर चितळे, ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ सीए आनंद जाखोटिया, सीए यशवंत कासार, पुणे शाखेच्या अध्यक्षा, परिषदेच्या समन्वयक सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव समीर लड्ढा, खजिनदार काशिनाथ पाठारे उपस्थित होते.
दोन दिवसीय या परिषदेचे उद्घाटन दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड असणार आहेत. यावेळी ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, केमिषा सोनी, दुर्गेश काब्रा यांचे विशेष मार्गदर्शन असणार आहे. दोन दिवसांच्या कालावधीत विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्या उपस्थितीत दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या परिषदेला जगभरातून ३५००-४००० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सार्क परिषदेतील देशांतूनही विद्यार्थी या परिषदेला येत आहेत. याशिवाय, या परिषदेत सीएचा अभ्यास करणारे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करणार आहेत.
केमिषा सोनी म्हणाल्या, “परिषदेच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए अमरजित चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऑडिटिंग आणि कॉर्पोरेट कायदा’ या विषयावर, दुसऱ्या सत्रात केपीआयटी टेकनॉलॉजीचे सहसंस्थापक सीए रवी पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ‘इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी अँड फायनान्स’ या विषयावर, तर अखेरच्या तिसऱ्या सत्रात ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए टी. एन. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होणार आहे. नवी दिल्ली येथील सीए डॉ. गिरीश अहुजा यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुसऱ्या दिवशी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशकंर आणि जगद्गुरू क्रिपालूजी योग केंद्राचे संस्थापक स्वामी मुकुंदानंदा यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन होणार आहे. पहिल्या सत्रात नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष सीए राजेश लोया यांच्या अध्यक्षतेखाली ‘टॅक्सेशन अँड इकॉनॉमिक्स’ या विषयावर, केंद्रीय समितीचे माजी सदस्य सीए डॉ. एस. बी. झावरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अकाउंटन्सी अँड स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर, तर अखेरच्या सत्रात इंदोर येथील सीए असीम त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘तत्त्वे’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. केमिषा सोनी यांचे विशेष मार्गदर्शन या सत्रात होईल.”
आयपीसीसी किंवा इंटरमीडियट स्टुडन्ट म्हणून नोंदणी असलेल्या तसेच सीपीटी परीक्षा पास केलेल्या, आर्टिकलशिप, ट्रेनिंग घेत असलेल्या, प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण केलेल्या परंतु अंतिम परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या परिषदेमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी पूर्व नोंदणीची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणीकरिता http://bosactivities.icai.org/ या संकेतस्थाळाला भेट द्यावी, असेही संयोजकांनी कळवले आहे.
————————
काश्मीरमध्येही कार्यालय सुरु होणार
जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास १००० सीएचे विद्यार्थी आहेत. शिवाय ईशान्य भारतातील तीन हजार विद्यार्थी सीएचा अभ्यास करीत आहेत. काश्मीरसह ईशान्य भारतातील विद्यार्थ्याने शुल्क माफ करण्यात येणार आहे. सध्या काश्मीरमध्ये ‘आयसीएआय’चे चॅप्टर असून, लवकरच तिथे कार्यालय सुरु केले जाणार आहे. त्यामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकेल, असेही दुर्गेश काब्रा यांनी सांगितले.