पुणे : गणेशोत्सवात संकलित झालेल्या निर्माल्यापासून बनवलेल्या खताचे मोफत वाटप रोटरी क्लबतर्फे करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेश पूजनासाठी मोठ्या प्रमाणावर फुले,फळे,नारळ यांचा वापर होतो व याचे निर्माल्य होते. या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम रोटरी क्लब युवा, ओपेल पोस्क्रो व वेस्ट वुड इस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला होता. पटवर्धनबाग येथील टँकर पॉईन्ट राबविलेल्या या उपक्रमात जवळपास १३५ टन निर्माल्याचे खत बनवण्यात आले आहे. १ ऑक्टोबरनंतर नागरिकांना हे खत घेऊन जाता येणार आहे.
रोटरी युवाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, माजी प्रांतपाल अभय गाडगीळ, मनोज धारप, माजी अध्यक्ष अजय कुलकर्णी, सचिव गोपाळ निर्मल, नगरसेवक जयंत भावे, नगरसेवक माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह अनेकानी या उपक्रमात सहभाग घेतला. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी उपक्रमाचे कौतुक करतानाच हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून तो केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर राबवावा, असे सांगितले. श्रीकांत जोशी म्हणाले, रोटरी युवा गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवत असून, तासाला दोन टन अशी या श्रेडींग मशीनची क्षमता आहे. यातून निर्माण झालेले खत व्यवस्थित पॅकींग करून नागरिकांना मोफत वाटण्यात येते.

