पुणे : “सर्व क्षेत्रात काम करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आयर्न लेडी इंदिरा गांधी आणि अशा असंख्य महिलांनी देशाला महान सुपुत्र दिले. त्यांच्यावर संस्कार केले. भारतीय संस्कृती अबाधित ठेवण्यात महिला नेहमीच अग्रस्थानी राहिल्या आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण केला पाहिजे,” असे मत विश्वशक्ती इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘सूर्यदत्ता स्त्रीशक्ती पुरस्कार’ वितरणप्रसंगी डॉ. दत्ता कोहिनकर बोलत होते. बावधन येथील सूर्यदत्ता एज्युकेशन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी स्ट्रैटर्जिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन ईटकर, सूर्यदत्ता ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने, सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेंद्र कासंडे आदी उपस्थित होते.
शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आबेदा इनामदार (शिक्षण), सरिताबेन राठी (अध्यात्मिक), मुक्ता पुणतांबेकर (समाजसेवा), तृप्ती देसाई (महिला सक्षमीकरण), डॉ. नीलिमा देसाई (समाजकार्य), मनीषा दुगड (उद्योग), अनुजा देशमाने (प्रशासन सेवा), मनीषा लुनावत (अध्यात्म), नम्रता फडणीस (पत्रकारिता), मीलन म्हेत्रे (पत्रकारिता) यांचा समावेश होता.
डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, “जिथे महिलांचा सन्मान होतो. तिथे आनंदी वातावरण असते आणि सर्व शक्ती तिथे वास करतात. निसर्गानेही स्त्रीला अतिशय महत्वाचे स्थान दिलेले आहे. त्या माता, पत्नी, बहीण, मैत्रीण म्हणून आपल्या सगळ्यांनाच उभारी देत असतात. किंबहुना आपल्या जगण्याची प्रेरणा बनत असतात.”
सचिन ईटकर म्हणाले, “महिला सक्षमीकरणासाठी या नऊ महिलांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. आपापल्या क्षेत्रात आलेल्या आव्हानांना सामोरे जात स्वतःचा ठसा यांनी उमटवला आहे. सगळ्या क्षेत्रात महिला बरोबरीनेच नाही, तर पुरुषाच्या एक पाऊल पुढे टाकून काम करत आहेत, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो.”
आबेदा इनामदार म्हणाल्या, मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण सर्वानी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. तृप्ती देसाई म्हणाल्या, महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी आमचा लढा आहे. स्त्री-पुरुष समानतेची भावना समाजात रुजावी, यासाठी यापुढे काम करत राहणार आहे. अध्यात्म आणि सामाजिक मूल्ये जपत आपला विकास साधण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे सरिताबेन राठी यांनी सांगितले. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या की, आज व्यसनाधीनतेने समाजाला ग्रासले आहे. यातून समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी मुक्तांगण प्रयत्न करीत आहे. डॉ. नीलिमा देसाई म्हणाल्या, वंचितांना नवक्षितिज दाखवण्याचे काम आम्ही करत असून, आपल्यासारख्या संस्थांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला पाहिजे.
चिकाटी आणि जिद्द या जोरावर महिला चांगल्या पद्धतीने उद्योग चालवू शकतात. उद्योग क्षेत्रात येण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करायला हवे, असे मनीषा दुगड यांनी सांगितले. अनुजा देशमाने म्हणाल्या की, पोलीस खाते म्हणजे पुरुषांचे आहे, असा समज आता मोडीत निघाला आहे. अनेक महिला पोलीस अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असून, येणाऱ्या आव्हानावर मात करीत आहेत,याचा आम्हालाही अभिमान वाटतो. नम्रता फडणीस म्हणाल्या, पत्रकारिता करतांना समाजातील विविध महिलांचे कार्य पाहिले आहे. सगळ्याच क्षेत्रांत महिला उत्तुंग कामगिरी करताहेत. त्यांचा उचित सन्मान करण्याची सूर्यदत्ताची परंपरा गौरवास्पद आहे. मीलन म्हेत्रे म्हणाल्या, सामाजिक भावनेतून गेली अनेक वर्षे पत्रकारिता करीत आहे. या पुरस्काराने आमच्या लेखणीला आणखी बळ मिळाले असून, समाजहिताचे काम करण्याची जबाबदारीही वाढली आहे.
स्त्रीशक्ती पुरस्कारप्राप्त महिलांनी आपले अनुभव व्यक्त करताना या पुरस्कारामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली असून, आणखी जोमाने काम करण्याचे पाठबळ मिळाल्याचे सांगितले.