पुणे : रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या माणसांना आणि जनावरांना दिलासा देण्याच्या भावनेतून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. माण तालुक्यातील १८ चारा छावण्यांवर राहत असलेल्या ३४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य, तर पाच चारा छावण्यांतील ७५० गुरांसाठी पशुखाद्य गुरुवारी दिले. राज्यात पहिल्यांदाच चारा छावण्यांवरील शेतकऱ्यांना अशी व्यक्तिगत मदत करण्यात आली आहे.
माण तालुक्यातील आंधळी गावातील चाराछावणीवर हा अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी युवराज ढमाले, वैष्णवी ढमाले, गीता जगताप, दिग्विजय जगताप, सातारा जिल्हा निवृत्त उपमुख्याधिकारी टी. आर.गारळे, अनिल देसाई, मामूशेठ वीरकर, बलवंत फौंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंगाडे, सुशील शिंगाडे, सर्जेराव घागरे, फौंडेशनचे विश्वस्त संगीता शिंगाडे, प्रतिभा पाटील व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३० दिवसांच्या या अन्नधान्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ याचा समावेश आहे. यामध्ये ज्वारी व बाजरी २० हजार किलो, तांदूळ १५ हजार किलो, डाळ साडेचार हजार किलो धान्य आणि २२.५ हजार किलो पशुखाद्य आहे.
युवराज ढमाले म्हणाले, “दुष्काळ निवारणासाठी शासन काम करत आहेच. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा उपक्रम घेतला. माझे सहकारी आणि माण तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या मदतीने या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आले. माझ्यासह सहकाऱ्यांनी गावाची पाहणी केली. त्यानंतर सगळ्या गोष्टींचे नियोजन करून चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या. दुष्काळी भागातील या लोकांसाठी आणि जनावरांसाठी मला मदत करता आली, याचे समाधान आहे. समाजातील व्यक्तींना आवाहन करतो की, आपणही आपल्या परीने पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी योगदान द्यावे.”
वैष्णवी ढमाले म्हणाल्या, “वर्षभर शेतकरी राबराब राबत असतो. लाखोंचा पोशिंदा अशी त्याची ओळख आहे. परंतु, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीने तो संकटात सापडला आहे. अशावेळी आपण पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे. आज या शेतकऱ्यांना अन्नधान्य दिल्यानंतर मोठे मानसिक समाधान मिळाले आहे. यापुढेही अशा स्वरूपाची मदत आमच्याकडून केली जाईल.”
मामुशेठ वीरकर म्हणाले, “शासन आपल्या परीने मदत करत आहे. पण युवराज ढमाले यांच्यासारख्या समाजातील दानशूर व्यक्तींनी शेतकऱ्यांना मदत केल्याने दुष्काळाचा सामना करण्याचे बळ त्यांना मिळाले आहे. ढमाले यांच्या मदतीमुळे या शेतकऱ्यांना दोन वेळचे चांगले जेवण मिळणार असून, गुरांनाही सकस खाद्य मिळणार आहे. त्यांच्यासारख्या दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला, तर दुष्काळाची तीव्रता कमी होईल. चारा छावण्यांना मदत करणारे युवराज ढमाले हे महाराष्ट्रातील पाहिलेच व्यक्ती आहेत. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.”
कार्यक्रमाची प्रस्तावना चारुशीला पाटील यांनी केली. आभार बलवंत पाटील यांनी मानले.