पुणे : “हिरोशिमा व नागासाकीवर झालेले अणुस्फोट, किरणोत्सर्गाबाबत (रेडिएशन) असलेले गैरसमज यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. अणुऊर्जा प्रकल्प हे अतिशय काळजीपूर्वक चालवले जातात. तसेच या प्रकल्पांचा सामान्य लोकांना किंवा तेथे काम करणाऱ्यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र नाहक भीती आणि राजकीय कुरघोडी यांच्यात अणुऊर्जा प्रकल्प अडकतात. राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकजण अणुप्रकल्पाविषयी भीती पसरवितात. अणुऊर्जा प्रकल्प अतिशय सुरक्षित असून, आपल्याला इंधननिर्मिती, विद्युतनिर्मितीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता अणुऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्रोत्साहन द्यायला हवे,” असे स्पष्ट मत रसायनशास्त्रज्ञ डॉ. नीलिमा राजूरकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अणुऊर्जा : मिथक आणि सत्य’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. राजूरकर बोलत होत्या. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., कार्यवाह संजय मालती कमलाकर, भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमधील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. एस. जी. मराठे यांच्यासह विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. राजूरकर म्हणाल्या, “दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये हिरोशिमा, नागासाकी येथे टाकलेले अणुबॉम्ब, १९७९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियातील तीन माईल आयलंड व १९८६ मध्ये युक्रेन, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेले अपघात याची भीती सामान्यांच्या मनात घर करून बसली आहे. परंतु, इतर क्षेत्रातील अपघातांप्रमाणेच हे अपघात होते. त्याच भीतीपोटी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालाही विरोध होतो आहे. मात्र, अणुऊर्जा अतिशय सुरक्षित आणि भविष्यात उपयुक्त असलेली गोष्ट आहे. आज भारताकडे ७७८० मेगावॅट क्षमतेचे ७ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. कार्बनमुक्त असलेल्या या अणुऊर्जेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. किरणोत्सारी पदार्थांचा पुनर्वापर होतो. पुढील १०० वर्षे पुरेल इतका युरेनियमचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे.”
विनय र. र. म्हणाले, “आग, पाणी, वाहतूक यांच्या अपघातामध्येही हजारो माणसे मारतात. म्हणून काही आपण ते वापराने बंद करत नाही. अपघात होणार नाहीत, याची पुरेशी काळजी घेऊन पर्यावरणपूरक अणुऊर्जेचा वापर वाढविणे गरजेचे आहे. आज तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून, त्याचा सुरक्षेसाठी उपयोग करून अणुऊर्जेला आपण प्राधान्य द्यायला हवे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अशा प्रकारचे जागृतीपर कार्यक्रम उपयुक्त ठरतील.”

