पुणे : “तरुणपिढी स्वैराचारी, सोशल मीडियात गुरफटत असून, वाचनसंस्कृती लोप पावत आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. तरुणांमध्ये ज्ञानाची भूक मोठी आहे. ही भूक इंटरनेट भागवू शकत नाही. मराठी तरुणाईला वैचारिक वाङ्मय वाचायला आवडते. तसे सकस साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर ‘पुस्तकांबरोबर चहा’ या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘वर्ड्स अँड सीप्स’ या बुक कॅफेला डॉ. साळुंखे यांनी भेट दिली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. येथे असलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील अनेक गाजलेली दर्जेदार पुस्तके पाहून डॉ. साळुंखे यांनी कौतुक केले. प्रसंगी सनदी अधिकारी धीरज मोरे, ‘वर्ड्स अँड सीप्स’चे एजाज शेख आदी उपस्थित होते.
डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, “पुस्तके आणि चहा असे मिश्रण असलेले ग्रंथालय पहिल्यांदाच पाहिले. सहज चहा घेताना सेल्फमध्ये लावलेल्या पुस्तकांवर नजर पडते आणि पुस्तक वाचण्याची इच्छा होते, असे हे बुक कॅफे आहे. तरुणपिढीला वाचायला लावण्याचा हा अनोखा प्रयत्न कौतुकास्पद आहे. व्यासंगी वाचकांसाठी या तरुणांनी साहित्याचा एक खजिना उपलब्ध करून दिला आहे.” एजाज शेख यांनी स्वागत केले.

