पुणे : पाम्पोर येथील दहशतवाद्यांच्या हल्यात पुण्यातील सौरभ नंदकिशोर फराटे (वय ३२) हे जवान शहीद झाले आहे. उद्या दुपारी त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात येणार असून फुरसुंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फराटे यांच्या निधनाचे वृत्त येताच परिसरावर शोककळा पसरली होती. फराटे ८ दिवसांपूर्वीच सुटी संपवून पुन्हा सेवेत दाखल झाले होते. मुळचे लोणी कंद येथील असणारे फराटे कुटुंबिय फुरसुंगी येथील गंगानगर भागातील गुरुदत्त कॉलनी येथे ते राहतात. त्यांच्या मागे पत्नी, एक वर्षांच्या जुळ्या मुली, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. फराटे कुटुंबात लष्कराची परंपरा आहे. त्यांचा लहान भाऊही लष्करातच आहे. वडील सुरक्षारक्षकाचे काम करतात. सौरभ हे दोन वर्षांनी निवृत्त होणार होते.
जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर शहराच्या काडलाबल या भरगर्दीच्या ठिकाणी शनिवारी दुपारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.यामध्ये फराटे यांचा समावेश आहे . या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला करून दहशतवादी लगेच पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.
हे दहशतवादी मोटरसायकलवरून आले असावेत, अशी शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचा शोध घेण्यात येत असून, शहराला सर्व बाजूने वेढा घालण्यात आला आहे. घराघरांत व जंगलातही दहशतवाद्यांना शोधणे सुरू आहे.

