पुणे, ता. ३ एप्रिल – देशभरात ‘संस्कृती की पाठशाला’ निर्माण करणे आवश्यक आहे. जिथे सर्वसामान्य जनतेला भारतीय संस्कृतीचे ज्ञान देता येईल, विद्वानांना प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती प्रदान करता येईल आणि प्रादेशिक भाषांतून संस्कृतीचा प्रसार होऊ शकेल असे मत श्री कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती यांनी व्यक्त केले.
‘फरगॉटन रूट्स’ या शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्राची जावडेकर यांनी निर्मिती केलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते .
शंकराचार्य पुढे म्हणाले,’भारताचे भारतीयत्व टिकविण्यासाठी भारतीय संस्कृती, सभ्यता, सदाचार, भाषा, साहित्य, चित्रकला, शास्त्रीय संगीत, पर्यावरण आदींचा प्रचार करणे आवश्यक आहे. गेल्या ३०-४० वर्षांत भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. तिच्यावरील श्रद्धा कमी होत आहे. भारतीय संस्कृतीत विषयांची कमी नाही. ज्ञानाचा खजिना आहे. तो संरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी संस्कृत आणि संस्कृतीचा इंग्रजीत प्रसार केला पाहिजे. यासाठी ‘फरगॉटन रूट्स’ या ग्रंथाची निर्मिती स्तुत्य आहे.’
गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, ‘उपजीविकेसाठी कौशल्य विकसित करण्याचे कार्य शाळेतील शिक्षणाने होते. चांगला मनुष्य घडवण्याची ताकद भारतीय ग्रंथांमध्ये आहे. भारतीय साहित्य, योग, वेद सर्वोत्कृष्ट आहेत. जे जे चांगले आहे ते भारतात आहे. विदेशातून आलेले चांगले आपण स्वीकारले पाहिजे. मुलांना त्यांच्या भाषेत, शैलीत ज्ञान दिले पाहिजे. अमेरिकीकरण रोखण्यासाठी वेद आणि विकास यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. त्यासाठी भारतीय ग्रंथ महत्त्वाचे असून, मुलांना त्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे.’
खासदार जावडेकर म्हणाले, नवीन अभ्यासक्रमात भारतीय संगीत, नृत्य, ज्योतिष्यशास्त्र, पुरातत्व आदी विषयांचा समावेश करण्यात येत आहे. भारतीय ज्ञान, परंपरांवर चर्चा झाली पाहिजे. ‘फरगॉटन रूट्स’सारख्या ग्रंथांमुळे भारतीय पारंपरिक ज्ञान, प्रथा, परंपरा यांचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.
डॉ. प्राची जावडेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक भाषण केले. डॉ. अदिती वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.
पुरातन काळातील अनेक विद्वानांनी संस्कृत भाषेतून विज्ञान, संस्कार, उपचार, औषधे, सुयोग्य आचार विचार अशा गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्या आहेत. हे ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचले तर भावी पिढ्या सुसंस्कारित आणि प्रगतीशील होतील. ‘फरगॉटन रूट्स’ या पुस्तकात नव्या-जुन्या ज्ञानाचा मेळ घालून आधुनिक जीवनात उपयुक्त असणारी जीवनसूत्रे उलगडून दाखवली आहेत. त्याला संशोधनाची भक्कम जोड आहे. व्यवस्थापन सिद्धांत, संस्कृत श्लोक, कथा आणि स्वयंअध्ययन उपक्रम अशा आशयाची मांडणी केली आहे. किशोरवयीन मुलांना आणि त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

