पुणे- नेत्रदीपक विद्युत रोषणाई, भव्य मंडप, स्वयंसेवकांची
लगबग, विविध प्रकारचे स्टॉल्स, रांगोळ्यांची आणि विविध प्रकारच्या
फुलांची मनमोहक आरास, आध्यात्मिक पुस्तके आणि महाप्रसादाचे
वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, राधा कृष्णाच्या विग्रहांचा
आकर्षक शृंगार, टाळ मृदंगाचा गजर आणि सुमधुर कीर्तनाचे
आवाज………. अशा प्रकारच्या भक्तिमय वातावरणात इस्कॉनच्या कात्रज
कोंढवा रोड आणि कॅम्प येथील मंदिरात पुणेकरांनी दिव्य अशा श्रीकृष्ण
जन्माष्टमी सोहळ्याचा अनुभव घेतला आणि प्रत्येक पुणेकर
भक्तीभावामध्ये अक्षरशः न्हाऊन निघाला.
पहाटे ४:३०वा. मंगल आरतीने या सोहळ्याची सुरुवात
झाली, यावेळी सुमारे ३००० भाविकांनी उपस्थिती लावली. या नंतर
मंदिराचे अध्यक्ष श्रीमान राधेश्याम प्रभू यांचे श्रीकृष्ण जन्माष्टमी या
विषयावर प्रवचन झाले. त्यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्णांचा जन्म
हा एक अंधःकारमय तुरुंगात झाला, परंतु त्यांचा जन्म झाल्यावर तोच
तुरुंग दिव्य प्रकाशाने व्यापून गेला आणि तेथील बंद दरवाजे उघडले आणि
साखळ्या, ज्यामध्ये देवकी आणि वासुदेवाना कैद करून ठेवण्यात आले
होते त्या तुटून पडल्या. त्याच प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सोहळा कोणी
साजरा करतो तेंव्हा त्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधःकार नाहीसा
होतो आणि तो मनुष्य मायेच्या बंधनातून मुक्त होतो.
दोन्ही मंदिरामध्ये दिवसभर नागरिकांची रीघ लागली
होती. मंदिरामधील विविध स्टॉल्स, कीर्तन, प्रवचन, संगीत, सांस्कृतिक
कार्यक्रम, महाप्रसाद आणि भगवंतांच्या दिव्य दर्शनाचा जवळपास एक
लाखाच्यावर भाविकांनी लाभ घेतला.
इस्कॉनच्या सर्व मंदिरांमध्ये परंपरे प्रमाणे जन्माष्टमीच्या
दिवशी भगवान श्रीकृष्णांचा दिव्य अभिषेक केला जातो, त्यामध्ये सुमारे
५० प्रकारच्या अभिषेक सामाग्रींचा वापर केला जातो. सुमारे पाच हजार
लोकांनी हा अभिषेक केला. मंदिरातील भक्तांनी तसेच बाल गोपाळांनी
भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांवर आधारित नृत्य, गायन, नाटिकांचे
सादरीकरण केले. इस्कॉनचे संस्थापकचार्यांच्या जीवनावरील आधारित
प्रदर्शनी, लहान मुलांच्या संस्कारांशी संबंधित स्टॉल्स, अध्यात्मिक
पुस्तकांचे स्टॉल्स आणि गीतेतील तत्त्वज्ञान समजावून देणारे देखावे
पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंदिरामध्ये वृंदावन
आणि गोवर्धनची प्रतिकृती आणि तेथील कृष्णलीलांचे प्रदर्शन जणू साक्षात
वृंदावनात गेल्याची अनुभूती करून देत होते.
या सोहळ्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन
करमाळकर, पुणे पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला, पुणे महानगर
पालिकेचे आयुक्त श्री कुणाल कुमार, पुणे कॅन्टोन्मेट बोर्डाचे प्रमुख
कार्यकारी अधिकारी श्री डी. एन. यादव, पुणे पोलीस उपायुक्त श्री
सुधाकर पठारे, पुणे महानगर पालिकेचे सह आयुक्त श्री विलास कानडे,
नगरसेविका सौ. संगीताताई ठोसर, माजी महापौर श्री प्रशांत जगताप,
श्री मिलिंद एकबोटे, युवसेना अध्यक्ष श्री किरण साळी तसेच पुणे
शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक
मान्यवरांनी हजेरी लावली.
या दरम्यान अत्यंत शिस्तबध्द वाहतूक व्यवस्था, मुबलक
पार्किंगची सोय आणि सुव्यवस्थित दर्शनाची सोय यामुळे सर्व नागरिकांना
कार्यक्रमाचा लाभ घेता आला. वाहतूक शाखा आणि पुणे पोलिसांचे या
कार्यक्रमासाठी फार मोठे सहकार्य लाभले.

